कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाला तब्बल १२५ कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले. या बक्षिसातील ५ कोटी एवढी रक्कम प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मिळणार होती. मात्र, दिलदार द्रविड यांनी बोनस म्हणून मिळणारी अतिरिक्त घेण्यास नकार दिला. द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणून मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार दिला आहे. याचाच दाखला देत माजी खेळाडू नवज्योतसिंग सिंद्धू यांनी द्रविड यांना शायरीतून सलाम ठोकला.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून द्रविड यांच्या निर्णयाला दाद दिली. ते म्हणाले की, हा सुगंध कोणत्या परफ्युमचा नसून द्रविडच्या चारित्र्याचा आहे... तसेच सिद्धू यांनी 'इत्र से कपड़ों का महकाना कोई बड़ी बात नहीं है, मज़ा तो तब है जब आपके किरदार से खुशबू आये', या ओळी शेअर करत द्रविड यांच्या दिलदारपणाचे कौतुक केले.
बीसीसीआयने विश्वचषक विजेत्या संघाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ही रक्कम खेळाडू आणि कोचिंग स्टाफमधील ४२ सदस्यांमध्ये वाटली जाणार आहे. १२५ कोटी रुपयांमधून संघातील सर्व १५ सदस्य आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळतील. तर कोचिंग स्टाफमधील इतर सदस्यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये मिळणार आहेत. ट्वेंटी-२० विश्वचषकामध्ये राहुल द्रविड यांच्यासोबत सपोर्ट स्टाफमध्ये विक्रम राठोड, पारस म्हाम्ब्रे आणि टी. दिलीप यांचा समावेश होता.
दरम्यान, राहुल द्रविड यांनी विश्वविजयासाठी मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार दिला आहे. आपल्याला इतर कोचिंग स्टाफला मिळणाऱ्या रकमेएवढीच रक्कम देण्यात यावी अशी मागणी राहुल द्रविड यांनी केली. याचाच अर्थ राहुल द्रविड त्यांना मिळणाऱ्या ५ कोटी रुपये बक्षीसाच्या रकमेपैकी २.५ कोटी रुपयांवर पाणी सोडण्यास तयार आहेत. ते कोचिंग स्टाफमधील इतर सदस्यांप्रमाणेच २.५ कोटी रुपयेच घेतील.
कोणाला किती रूपये मिळणार?प्रत्येकी ५ कोटी - १५ खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड प्रत्येकी २.५ कोटी - प्रशिक्षक (फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी)प्रत्येकी २ कोटी - फिजिओथेरपिस्ट, थ्रोडाउन स्पेशालिस्ट, मालिश करणारे आणि कंडिशनिंगप्रत्येकी १ कोटी - निवडकर्ते आणि राखीव खेळाडू