T20 World Cup, BANGLADESH V ZIMBABWE : बांलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रुप २ मध्ये ३ सामन्यांत दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानला पराभूत करणारा झिम्बाब्वे आज अपयशी ठरला. क्षेत्ररक्षणात केलेल्या चूकांमुळे झिम्बाब्वेचा पराभव झाला. सिन विलियम्स व रायन बर्ल यांनी झिम्बाब्वेचा संघर्ष सुरू ठेवला होता. त्यात No Ball च्या नाट्याने त्यांना एक संधीच मिळाली होती, परंतु अखेरच्या चेंडूवर फटका चूकला. झिम्बाब्वेने बांगलादेशला हा सामना सहजासहजी जिंकू दिला नाही. बांगलादेशच्या या विजयाने पाकिस्तानला सेमी फायनलचे स्वप्न पडू लागली आहेत आणि हे समीकरण शक्य आहे.
सौम्या सरकार ( ०) व लिटन दास ( १४) या दोन अनुभवी फलंदाजांना माघारी पाठवून झिम्बाब्वेने सुरुवात तर चांगली केली. पण, नजमूल शांतो व शाकिब अल हसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करून बांगलादेशची गाडी रुळावर आणली. झिम्बाब्वेकडून आज क्षेत्ररक्षणात प्रचंड चुका झाल्या आणि त्याचा फायदा बांगलादेशने उचलला. शाकिबच्या ( २३) विकेटनंतर आफिफ होसैनने जोरदार फटकेबाजी करताना १९ चेंडूंत २९ धावा केल्या. शांतो ५५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ७१ धावांवर बाद झाला. २०व्या षटकात तीन विकेट्स गमावल्यानं बांगलादेशला ७ बाद १५० धावांवर समाधान मानावे लागले. रिचर्ड एनगारावा ( २-२४) व ब्लेसिंग मुझाराबानी ( २- १३) यांच्यासह सिकंदर रजा व सीन विलियम्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तस्कीन अहमदने झिम्बाब्वेला हादरे दिले. अवघ्या १७ धावांवर त्यांचे दोन फलंदाज माघारी पाठवले. वेस्ली माधेव्हेरे ( ४) व क्रेग एर्व्हीन ( ८) माघारी परतल्यानंतर मिल्टन शुम्बा व सिन विलियम्स डाव सावरतील असे दिसत होते. पण, मुस्ताफिजूर रहमानने त्याच्या पहिल्याच षटकात शुम्बाला ( ८) बाद केले. शाकिबने मिड ऑफला अप्रतिम झेल टिपला. त्याच षटकात सिंकदर रजा ( ०) यालाही माघारी पाठवून रहमानने सामना बांगलादेशच्या बाजूने पूर्णपणे झुकवला.झिम्बाब्वेने पहिल्या १० षटकांत ४ बाद ६४ धावा केल्या होत्या आणि अखेरच्या ६० चेंडूंत त्यांना ८५ धावा करायच्या होत्या. सिन विलियम्स व रेगीस चकाब्वा यांची भागीदारी चांगली सुरू होती आणि बांगलादेशने प्रमुख गोलंदाज तस्कीनला पुन्हा बोलावले. तस्कीनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना चकाब्वाला ( १५) अगदी सहज बाद केले.
झिम्बाब्वेला ५ षटकांत ५६ धावा करायच्या होत्या. विलियम्स व रायन बर्ल यांनी चांगली फटकेबाजी सुरू ठेवली होती. त्यामुळे सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, याचा अंदाज बांधणे अवघड होते. तस्कीनने ४-१-१९-३ अशी उल्लेखनीय कामगिरी केली. ४ षटकांत ४६ धावांची गरज असाताना मुस्ताफिजूरचे षटक निर्णायक ठरले आणि त्याने केवळ ६ धावा दिल्या. मुस्ताफिजूरने १५ धावांत २ विकेट्स घेतल्या. विलियम्सने ३७ चेंडूंत ट्वेंटी-२०तील दहावे अर्धशतक पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक ठरले. हसन महमूदने १४ धावा दिल्याने झिम्बाब्वेला १२ चेंडूंत २६ धावा करायच्या होत्या.
बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिबने १९व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. पहिल्या तीन चेंडूंवर ७ धावा आल्यानंतर चौथ्या चेंडूवर अविश्वसनीय क्षेत्ररक्षण करताना विलियम्सला रन आऊट केले. विलियम्सन ४२ चेंडूंत ८ चौकारांसह ६४ धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेला ६ चेंडूंत १६ धावा करायच्या होत्या. रिचर्डन एनगारावाने येताच चौकार-षटकार खेचला. पण, ३ चेंडूंत तो १० धावा करून बाद झाला. १ चेंडू ५ धावा हव्या असताना अखेरचा चेंडू निर्धाव पडला अन् बांगलादेशने विजयाचा आनंद साजरा केला. पण, बांगलादेशच्या यष्टीरक्षकाने चेंडू स्टम्प्सच्या पुढे पकडला अन् नो बॉल दिला गेला. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा मैदानावर बोलावले गेले, पण बांगलादेशने फ्री हिटचा चेंडू निर्धाव ठेवण्यात यश मिळवले अन् ३ धावांनी सामना जिंकला.
बांगलादेशच्या विजयाने पाकिस्तानला लाभ...
- पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेच्याही उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांना उर्वरित सामन्यांत बांगलादेश, नेदरलँड्स व भारताचा सामना करायचा होता आणि यापैकी दोन सामने जिंकल्यास त्यांची गुणसंख्या ७ होईल. पण, बांगलादेशकडून आज झिम्बाब्वेचा पराभव झाला आणि हा निकाल पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारा ठरतोय.
- झिम्बाब्वे व बांगलादेश यांचे प्रत्येकी ३ सामने झाले आहेत आणि अनुक्रमे ४ व ३ गुण आहेत. बांगलादेशला उर्वरित सामन्यांत भारत व पाकिस्तानचा सामना करायचा आहे. अनपेक्षित निकाल न घडल्यास बांगलादेश दोन्ही सामने हरू शकतात असा अंदाज आहे. अशात ५ सामन्यांती ते ४ गुणांवरच राहतील. पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका ही लढत निर्णायक ठरेल. पाकिस्तान उर्वरित तीन सामने जिंकून ६ गुणांसह आघाडीवर येतील.
- दक्षिण आफ्रिकेला उर्वरित तीन सामन्यांत भारत-पाकिस्तान-नेदरलँड्स यांच्याविरोधात खेळायचे आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायचे असेल तर त्यांना आफ्रिकेला हरवावे लागेल. त्याचवेळी भारताकडूनही आफ्रिका हरावी अशी प्रार्थना करावी लागेल. मग आफ्रिका नेदरलँड्सविरुद्ध जिंकले तरी त्यांची गुणसंख्या ५ राहिल. मग, टीम इंडिया आणि पाकिस्तान ग्रुप २ मधून सेमी फायनलसाठी पात्र ठरतील..
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, ZIM vs BAN : Qualification scenarios of group 2, Bangladesh have defeated Zimbabwe by 3 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.