Join us  

त्रासाचे ओझे काढून टाका, प्रवास सोपा होत जाईल!

२०२३ मध्ये भारतीय संघासमोर असलेल्या आव्हानांविषयी जाणून घेऊया…

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 9:08 AM

Open in App

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

२०२२ संपण्याच्या मार्गावर आहे. २०२३ च्या स्वागतास आपण सज्ज आहोत. नवे वर्ष काय घेऊन येणार, आपण काय साध्य करू शकतो, यावर नजर टाकूया... मावळत्या वर्षात भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद कमी आणि पराभवाचे शल्य अधिक अनुभवायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव, इंग्लंडविरुद्ध शिल्लक राहिलेल्या अखेरच्या कसोटीतही पराभव,  आशिया चषकात फायनलने दिलेली हुलकावणी, टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून झालेला दारुण पराभव आणि वर्ष संपताना बांगला देशविरुद्धची वन डे मालिका गमविल्यामुळे झालेली नामुष्की या सर्व जखमा २०२२ ने दिल्या.

दरम्यान, २०२२ ला दोनदा पाकिस्तानला पराभूत करणे, स्थानिक मालिका विजय, ईशान किशनचे वन डेत सर्वांत वेगवान द्विशतक, विराटने हारिस रौफच्या चेंडूवर मारलेला ऐतिहासिक आणि अविस्मरणीय षट्कार या घटना सुखावून गेल्या. आता २०२३ मध्ये असलेल्या आव्हानांविषयी जाणून घेऊया…

डब्ल्यूटीसी फायनल

सध्या भारतीय संघापुढे सर्वांत मोठे आव्हान आहे ते विश्व कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गाठण्याचे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला ३-० ने हरविले आणि भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाला इतक्याच फरकाने पराभूत केल्यास भारताची फायनल खेळण्याची शक्यता कायम असेल. 

वन डे विश्वचषक

भारतीय संघ २०२३ च्या ऑक्टोबरमध्ये वन डे विश्वचषकाचे यजमानपद भूषविणार आहे.  १२ वर्षांनंतर वन डे विश्वचषकाचे भारतात पुन्हा आयोजन होईल. २०११ ला महेंद्रसिंग धोनीच्या संघाने जेतेपदाचा मान मिळविला होता. स्थानिक मैदानांवर भारताने विश्वचषक जिंकावा, अशी सर्वांची इच्छा आहे.  भारताने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुठलीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. २०२३ ला जेतेपदाची ही संधी चालून येणार आहे. डब्ल्यूटीसी फायनलचे आयोजन जून महिन्यात ओव्हल मैदानावर होणार आहे. एकाचवर्षी डब्ल्यूटीसी आणि वन डे विश्वचषक जिंकण्याचा दुग्धशर्करा योग भारतीय संघासाठी उपलब्ध होणार आहे.   कर्णधार, कोच, निवड समितीबाबत डोकेदुखी

रोहितचा फिटनेस, खराब कामगिरी, राहुलचा खराब फॉर्म, खेळाडूंना प्रेरणा देण्यात कोच राहुल द्रविड यांना आलेले अपयश, टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर निवड समितीला बळीचा बकरा बनविणे यामुळे भारतीय क्रिकेट द्विधा मनस्थितीत असल्याचे जाणवते.  निवड समितीची पुनर्स्थापना करण्याचे आव्हान कायम आहे. भारतीय क्रिकेटमधील धुरिणांनी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांची ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी... 

बॉर्डर-गावसकर चषक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे द्वंद्व गेल्या काही वर्षांत चुरशीचे ठरताना दिसते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान मिळविण्याच्या उत्सुकतेपोटी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका स्फोटक होईल. मालिकेतील विजेत्याला  बॉर्डर- गावसकर चषक दिला जातो. भारताने मागील तीन प्रयत्नांत हा चषक गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियानेदेखील २००४ चा अपवाद वगळता भारताला भारतात पराभूत केलेले नाही. चार सामन्यांच्या मालिकेत रोमांचक  क्रिकेटची चाहत्यांना प्रतीक्षा असेल.

वह प्रदीप जो दिख रहा है झिलमिल, दूर नहीं है, थककर बैठ गए क्या भाई! मंजिल दूर नहीं है! 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Open in App