भारतीय क्रिकेट संघानं घरच्या मैदानावर नववर्षात झालेल्या पहिल्या दोन मालिकांमध्ये विजय मिळवत 2020ची सुरुवात दणक्यात केली. टीम इंडियानं श्रीलंकेला ट्वेंटी-20त ( 2-0), तर ऑस्ट्रेलियाला वन डे ( 2-1) मालिकेत पराभूत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत लोकेश राहुल विविध भूमिकेत दिसला. त्यानं यष्टिरक्षक, सलामीवीर, मधल्या फळीतील फलंदाज अशा विविध भूमिका पार पाडल्या आणि त्यात तो यशस्वीही ठरला. या मालिकेनंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयाप्रती संताप व्यक्त केला. राग व्यक्त करताना वीरूनं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या काळात असं वातावरण कधीच नव्हतं, याचाही उल्लेख केला.
तो म्हणाला,''लोकेश राहुल पाचव्या क्रमांकावर अपयश झाला तरी भारतीय संघ व्यवस्थापक त्याच्या क्रमवारीत त्वरीत बदल करतील. महेंद्रसिंग धोनीच्या काळात असे कधीच झाले नाही. आता धोनी कर्णधार असता तर प्रत्येकाला पुरेशी संधी दिली गेली असती. पण, सध्या संघ व्यवस्थापन खेळाडूच्या अपयशानंतर त्वरित त्याच्या फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय घेत आहे. मात्र, धोनी अशा परिस्थितील खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभा राहिला असता, कारण तोही या परिस्थितीतून कधीकाळी गेला होता.'' संघ व्यवस्थापनाचं नाव पुढे करताना वीरुनं अप्रत्यक्षपणे कोहलीवर निशाणा साधला आहे.
''धोनी कर्णधार होता तेव्हा फलंदाजीच्या क्रमाबाबत स्पष्टता होती. त्याला प्रत्येक खेळाडूंमधील प्रतिभेची योग्य जाण होती आणि अशा प्रतिभावान खेळाडूंना हेरून त्यानं टीम इंडियाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली. सलामीवीर कोण, मधल्याफळीत कोण हे स्पष्ट चित्र त्याच्या डोक्यात हते. पण, आता जर लोकेश पाचव्या क्रमांकावर चारवेळा अपयशी ठरला, तर कोहली लगेच त्याची क्रमवारी बदलेल. धोनीच्या काळात असे होत नव्हते.''
सहवाग म्हणाला,''सुरुवातीला रोहित शर्मा मधल्या फळीत खेळायचा, परंतु तेथे त्याला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. त्याला सलामीला खेळवण्याचा निर्णय धोनीचा होता.''