नवी दिल्ली : ५ ऑक्टोबरपासून भारतीय संघ एका नव्या अध्यायाचा सामना करणार आहे. कारण तब्बल १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाकडे पाहिले जात आहे. या स्पर्धेसाठी रोहितसेनेची घोषणा झाली असून १५ शिलेदारांच्या खांद्यावर तमाम भारतीयाचे स्वप्न असणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेपूर्वी क्रिकेट जगतातील जाणकारांसह माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहेत. अशातच क्रिकेटची 'greatest rivalry' या कार्यक्रमात भारताचा माजी फिरकीपटू आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने हजेरी लावली. यावेळी बोलताना दोन्हीही दिग्गजांनी आपापल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, विश्वचषक कोण उंचावणार याबाबत चर्चा करताना भज्जी आणि अख्तर यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. शोएबने पाकिस्तानच्या तर हरभजनने भारताच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. अख्तरने सांगितले की, पाकिस्तानी संघ भारतात खेळणार असल्यामुळे त्यांनी बिल्कुल घाबरता कामा नये. कारण अनेकदा क्राउड प्रेशरमुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होते. भारत आणि पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी ५० हजार पेक्षा जास्त प्रेक्षक असतील. तिथे बहुतांश चाहते हे साहजिकच भारताचे असणार आहेत. पाकिस्तानचे फार चाहते नसल्यामुळे त्यांनी दबाव घेऊ नये. भारतीय संघावर मीडियाचा प्रेशर असेल पण पाकिस्तानवर कशाचाच प्रेशर नसेल. त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची शक्यता जास्त आहे.
अख्तर-भज्जीमध्ये खडाजंगीअख्तरने केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर देताना हरभजन सिंगने भारताची बाजू मांडली. "पाकिस्तानी संघाने मागील २ वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानकडे चांगल्या गोलंदाजांची फळी आहे, तर भारतीय संघात दिग्गज फलंदाजांचा साठा आहे. नवीन चेंडू भारताने चांगला खेळला तर त्यांना रोखणे कठीण आहे", असे भज्जीने नमूद केले.
२०११ च्या विश्वचषकाबद्दल बोलताना अख्तर म्हणाला की, आम्हाला त्यावेळी झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आम्ही भारताला बाहेरचा रस्ता दाखवू. अख्तरच्या विधानाची फिरकी घेताना हरभजनने २०११ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्याची आठवण करून दिली. तसेच २०५० नंतर तुम्ही भारताला हरवाल, असा टोलाही भज्जीने लगावला.
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू