harbhajan singh sreesanth । लखनौ : आयपीएलमधील कालचा सामना वादामुळे चांगलाच चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB vs LSG) यजमान लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्याच घरात पराभव केला. पण खेळ भावनेला ठेच पोहचवणाऱ्या काही घडामोडी कालच्या सामन्यात झाल्या. त्यामुळे या सामन्याने अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्या वादावर अनेक क्रिकेटपटू प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने या वादावर नाराजी व्यक्त केली आहे.
हरभजन सिंगने म्हटले, "कालच्या सामन्यात जे काही झाले ते क्रिकेटसाठी अत्यंत वाईट आहे. यामध्ये विराट कोहली, गौतम गंभीर की नवीन-उल-हकची चूक होती ते मला माहिती नाही. पण काल क्रिकेट कमी आणि लढाईच जास्त झाली. गंभीर आणि विराट भारतीय संघात होते तेव्हापासूनच दोघांचे संबंध बिघडले होते. क्रिकेट किती गांभीर्याने घेतले जात आहे ते पाहा, मला अजूनही श्रीशांतसोबतच्या घटनेची लाज वाटते. तेव्हा ते बरोबर वाटते पण आता खरंच पश्चाताप होत आहे."
भज्जीचा विराट-गंभीरला सल्ला भज्जीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना विविध बांबीवर भाष्य केले. विराट एक मोठा खेळाडू आहे. त्याने कोणाला काय बोलायला नको हवे होते. क्रिकेटमधील अनेक मोठे खेळाडू विराट, गंभीर आणि नवीन यांच्यामध्ये चुका काढतील. पण हे चित्र क्रिकेटसाठी चांगले नाही. मी एक चूक केली होती ज्याचा आजतागायत पश्चाताप होत आहे. यांना देखील १५ वर्षांनंतर याचा पश्चाताप होईल. जे झाले ते विसरून जा हाच मी सल्ला देईन, असे हरभजनने अधिक सांगितले.
RCBचा शानदार विजय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिस (४४) आणि विराट कोहली (३१) वगळता कोणत्याच आरसीबीच्या फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. निर्धारित २० षटकांत आरसीबीचा संघ ९ बाद १२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौच्या फलंदाजांची देखील वाईट अवस्था झाली. कृष्णप्पा गौतम (२३) वगळता एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. कर्णधार लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे लखनौच्या संघाची डोकेदुखी वाढली. अखेर लखनौचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १९. ५ षटकांत १०८ धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवून लखनौला पराभवाची धूळ चारली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"