चेन्नई: यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपद पटकावले. यानंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत एक विजेतेपदाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना स्टॅलिन यांनी महेंद्र सिंह धोनीचे तोंडभरून कौतुक केले. महेंद्र सिंह धोनीनेच पुढील अनेक सीझनसाठी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करावे अशीच आमची इच्छा आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
CSK ने गेल्या महिन्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून IPL २०२१ चे विजेतेपद पटकावले. यानंतर तामिळनाडूमध्ये विशेष विजेतेपदाच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रिय महेंद्रसिंह धोनी, तू अनेक सीझनसाठी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. धोनी तू झारखंडचा आहेस पण आमच्यासाठी, तामिळनाडूच्या लोकांसाठी तू आमच्यापैकी एक आहेस, असे कौतुकोद्गार स्टॅलिन यांनी काढले.
पुढील अनेक वर्षे चेन्नईच्या कर्णधारपदी पाहायचेय
मी येथे तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून नाही, तर धोनीचा चाहता म्हणून आलो आहे. केवळ मीच नाही, तर येथे उपस्थित असलेली माझी नातवंडेही त्याचे चाहते आहेत. माझ्या दिवंगत वडीलही धोनीचे चाहते होते. धोनीला आवाहन करतो की, आता निवृत्तीचा विचार करू नका. कारण आम्हाला त्याला पुढील अनेक वर्षे चेन्नईच्या कर्णधारपदी पाहायचे आहे, असा प्रेमळ सल्ला स्टॅलिन यांनी धोनीला दिला.
दरम्यान, आयपीएल २०२२ सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे. ही स्पर्धा एप्रिलमध्ये खेळली जाणार आहे. सध्या नोव्हेंबर सुरू आहे. मला त्यावर विचार करावा लागेल. मला घाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. मी नेहमी माझ्या खेळाची योजना बनवत असतो. शेवटचा एकदिवसीय सामना जन्मगावी रांची येथे खेळल्याचे धोनीने सांगितले. आशा आहे की, माझा शेवटचा टी-२० सामना चेन्नईतच होईल. तो पुढच्या वर्षी होईल की पुढच्या पाच वर्षात, हे माहिती नाही, असे धोनी म्हणाला.