जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरात 87 लाख 66,035 कोरोना रुग्ण आढळले असून 46 लाख 27,883 रुग्ण बरे झाले आहेत. पण, दुर्दैवानं 4 लाख 62,691 रुग्णांना जीव गमवावा लागला. बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार तमिन इक्बाल याचा भाऊ आणि माजी क्रिकेटपटू नफीस इक्बाल याला कोरोना झाल्याची बातमी समोर येत आहे. त्याची प्रकृती सुधासत आहे. बांगलादेशमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 05,535 इतकी झाली आहे. त्यापैकी 42945 रुग्ण बरे झाले असून 1388 रुग्णांना प्राण गमवावे लागले.
नफीस हा बांगलादेशच्या स्थानिक संघाचे प्रशिक्षकपद भूषवित होता. BDcritimeने दिलेल्या वृत्तानुसार नफीसची प्रकृती सुधारत आहे. 2003मध्ये इंग्लंडविरुद्ध नफीसनं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुढील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं 27 सामन्यांत चार अर्धशतकं व एक शतक झळकावलं. 2005मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या 121 धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 2006मध्ये त्यानं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
नफीसनं 11 कसोटी व 16 वन डे सामन्यांत अनुक्रमे 518 व 309 धावा केल्या आहेत. 2018मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या स्टाफचा सदस्य होता. मुस्ताफिजूर रहमान याचा भाषांतरकार म्हणून त्यानं मुंबई इंडियन्ससोबत काम केलं होतं.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यानं मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. त्यानं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे जाहीर करताना सर्वांना प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करा असं आवाहनही केलं. पण, मागील काही दिवसांपासून आफ्रिदीची प्रकृती खालावल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर आफ्रिदीचा एका व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यानं प्रकृती खालावल्याच्या अफवा असल्याचे स्पष्ट केले.
माजी फलंदाज तौफीक उमर याच्यानंतर कोरोनाची लागण झालेला आफ्रिदी हा पाकिस्तानचा दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. उमरनं कोरोनावर मात केली आहे. आफ्रिदीनं म्हटलं की,''मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे मी हा व्हिडीओ पोस्ट करत आहे. पहिले 2-3 दिवस हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते, परंतु आता माझी प्रकृती सुधारत आहे. मला माझ्या मुलांची आठवण येत आहे. पण, सध्या स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचे आहे.''