मुंबई : मुंबईकर तनुजा लेले यांची भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून निवड झाली. विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात स्ट्रेंथ आणि फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत असलेल्या तनुजा आगामी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघासोबत जातील.
७ ते २४ मार्च दरम्यान दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. लखनौ येथे होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाच्या फिटनेस ट्रेनर म्हणून तनुजा जबाबदारी सांभाळतील. कुर्ला येथील रहिवासी असलेल्या तनुजा सुरुवातीला जिम्नॅस्टिकमध्ये फिटनेस ट्रेनर होत्या. यानंतर पुदुच्चेरी क्रिकेट संघटनेकडून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी यूएईमध्ये महिला आयपीएलमध्येही ट्रेनर म्हणून काम केले. यंदाच्या विजेत्या ट्रेलब्लेझर्स संघाच्या फिटनेस ट्रेनर म्हणून त्यांनी काम केले.
‘जिम्नॅस्टच्या तंदुरुस्तीसाठी काम केल्यानंतर पदुच्चेरी क्रिकेट संघटनेच्या वतीने मी क्रिकेटशी जुळले. येथून मला गेल्यावर्षी यूएईमध्ये झालेल्या महिला आयपीएलसाठी संधी मिळाली. विजेत्या ट्रेलब्लेझर्स संघासोबतचा अनुभव फायदेशीर ठरेल. पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे या संधीचा जितका आनंद आहे, तितकीच मोठी जबाबदारीही आली आहे,’ असे तनुजा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.