वन डे विश्वचषक, दक्षिण आफ्रिका आणि भारताविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा झाली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी कांगारूचा संघ टीम इंडियाशी भिडेल. खरं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेनंतर दोन्हीही संघ विश्वचषक खेळतील. मग पुन्हा एकदा ट्वेंटी-२० मालिकेत हे संघ आमनेसामने असतील. ऑस्ट्रेलियन संघ या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या संघात भारतीय टॅक्सी चालकाच्या मुलाला संधी मिळाली आहे.
दरम्यान, भारतीय वंशाचा तन्वीर सांघा ऑस्ट्रेलियाकडून विश्वचषक खेळणार आहे. तन्वीरचा जन्म २१ नोव्हेंबर २००१ मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झाला. पण, त्याचे वडील जोगा सांघा भारतीय वंशाचे आहेत. जोगा हे पंजाबमधील जालंदर शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या रहीमपूर या गावात राहतात. १९९७ मध्ये ऑस्ट्रेलियाला गेले असता तन्वीरच्या वडिलांनी तिथे टॅक्सी चालवून उदरनिर्वाह केला. तन्वीर अंडर-१९ विश्वचषकात देखील ऑस्ट्रेलियन संघाचा हिस्सा होता. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणारा तन्वीर हा दुसरा भारतीय ठरला आहे. या आधी गुरिंदर सिंग सिंधू कांगारूच्या संघाकडून खेळला आहे.
पाच ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेपूर्वी यजमान भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळेल. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र, अद्याप भारतीय संघ जाहीर झालेला नाही.
भारत, दक्षिण आफ्रिका आणि वन डे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन अबॉट, ॲश्टन अगर, अलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, आरोन हार्डली, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिड हेड, जोश इंगिल्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.
वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
२२ सप्टेंबर, शुक्रवार - मोहाली, दुपारी १.३० वाजल्यापासून
२४ सप्टेंबर, रविवार - इंदौर, दुपारी १.३० वाजल्यापासून
२७ सप्टेंबर, बुधवार - राजकोट, दुपारी १.३० वाजल्यापासून
Web Title: Tanveer Sangha of Indian origin will play for Australia in the upcoming ODI World Cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.