IPL 2022, Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. लोकेश राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंस्टला ( LSG) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच धक्का बसला. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड ( Mark Wood) याने दुखापतीमुळे माघार घेतली. त्याची रिप्लेसमेंट म्हणून मेंटॉर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) ज्या खेळाडूसाठी थेट ढाक्यात फोन लावला, त्याचेही खेळणे अनिश्चित आहे.
मार्क वूड वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि तेथे त्याला दुखापत झाली. लखनौ सुपर जायंट्सने ७.५ कोटींत मार्क वूडला ताफ्यात घेतले होते. त्याच्या जागी LSG ने बांगलादेशचा गोलंदाज तस्कीन अहमद याची निवड केली होती. गंभीरने बांगलादेशच्या गोलंदाजासमोर पूर्ण पर्वासाठी करार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, त्यासाठी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सोडावी लागेल.
LSG चा हा प्रयत्नही फसल्यात जमा आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने आयपीएल २०२२ मध्ये खेळण्यासाठी तस्कीन अहमदला ना हरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचे स्पष्ट केले. ''सध्या सुरू असलेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आणि त्यानंतर भारताविरुद्धची मालिका लक्षात घेता तस्कीनला आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी देण्याची ही योग्य वेळ नक्कीच नाही,''असे BCBचे क्रिकेट ऑपरेशन चेअरमन जलाल युनूस यांनी सांगितले. ते म्हणाले,'' याबाबत आम्ही तस्कीनशीही चर्चा केली आहे आणि त्यालाही परिस्थिती समजावून सांगितली आहे. त्यानेही आयपीएल फ्रँचायझीला खेळणार नसल्याचे सांगितले आहे.''