क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे उगाच म्हटले जात नाही. येथे क्षणात होण्याचे नव्हते होते आणि नव्हत्याचे होतेही. त्यामुळे या खेळाचा थरार अनुभवण्यासाठी प्रेमी आतुरलेले असतात. मंगळवारी अशाच एका सामन्यात नाट्यमय कलाटणीची प्रचिती आली. तेथे विजयाच्या उंबरळ्यावरून एका संघाला माघारी फिरावे लागले. पाच फलंदाज शिल्लक असताना विजयासाठीही तेवढ्याच धावांची गरज होती. त्यामुळे प्रत्येक फलंदाज एक धाव करून माघारी परतला असता तर विजय पक्का होता. पण, प्रत्यक्ष सामन्यात घडले भलतेच... अवघ्या एका धावेनं या संघाला हार मानावी लागली.
तस्मानियन टायगर्स असे या संघाचे नाव. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श वन डे चषक क्रिकेट स्पर्धेत पर्थच्या वाका मैदानावर मंगळवारी टायगर्स विरुद्ध व्हिक्टोरीया असा सामना रंगला. धावांचा पाठलाग करणाऱ्या टायगर्स संघाला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे पाच विकेट्सही होत्या. पण, पत्त्याचा बंगला कोसळावा तशा विकेट्स पडल्या आणि टायगर्स संघाला एका धावेनं पराभव पत्करावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना व्हिक्टोरिया संघाची सुरुवातही निराशाजनक झाली. मार्कस हॅरिस ( 5) आणि अॅरोन फिंच ( 12) हे स्वस्ता माघारी परतले. मधल्या फळीतील फलंदाजांनाही फार योगदान देता आले नाही. ग्लेन मॅक्सवेल ( 34) आणि मॅट शॉर्ट ( 27) यांनी सहाव्या विकेट्ससाठी 45 धावांची भागीदारी केली. विल सदरलँडने 66 चेंडूंत 53 धावा करताना व्हिक्टोरियाला 185 धावांचा पल्ला गाठून दिला.टायगर्स हे आव्हान सहज पार करतील असे वाटत होते आणि सलामीवीर बेन मॅकडेर्मोटने 78 धावांची खेळी करताना संघाला दमदार सुरुवातही करून दिली होती. पण, त्यानंतर त्यांची घसरगुंडी उडाली. 185 धावांचा पाठलाग करताना 39.1 षटकांत त्यांची अवस्था 6 बाद 181 अशी होती. जॅक्सन कोलमनच्या तिसऱ्या चेंडूवर जेम्स फॉल्कनर बाद झाला. चार धावांची आवश्यकता असताना टायगर्सचे चार फलंदाज नऊ धावांत तीन धावा करून माघारी परतले, अन् व्हिक्टोरियानं हा सामना जिंकला.
पाहा व्हिडीओ...