कर्णधाराकडून अपेक्षा बाळगा, पण अपमानित करू नका

बंद दाराआड सल्लामसलत करता आली .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2024 11:16 AM2024-05-12T11:16:55+5:302024-05-12T11:18:12+5:30

whatsapp join usJoin us
tata ipl 2024 expect the captain but do not insult him | कर्णधाराकडून अपेक्षा बाळगा, पण अपमानित करू नका

कर्णधाराकडून अपेक्षा बाळगा, पण अपमानित करू नका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

आयपीएलच्या यंदाच्या सत्रात फ्रँचाइजी मालक आणि कर्णधार यांच्यातील संबंध आणि वागणूक हा मुद्दा ऐरणीवर आला. खरेतर दोन घटनांमुळे हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. लीग सुरू होण्याआधी रोहित शर्माची कर्णधारपदावरून उचलबांगडी करीत हार्दिक पांड्याकडे मुंबईचे नेतृत्व सोपविताच वादाला तोंड फुटले. रोहितच्या नेतृत्वात मुंबई पाच वेळा चॅम्पियन बनला. अशावेळी हार्दिकला कर्णधार बनविल्याचे चर्चा तर होणारच. 

हार्दिकला मुंबईतील सामन्यांदरम्यान रोहितच्या चाहत्यांकडून हुटिंगचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर चर्चा गाजली. याचा परिणाम असा झाला की, मुंबई संघ लक्ष्यापासून भरकटला. दुसरा वाद हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवामुळे भडकलेल्या लखनौच्या संघ मालकाने कर्णधार लोकेश राहुलची भर मैदानात काढलेल्या खरडपट्टीमुळे झाला. या घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यात मालक रागात असून, ते राहुलला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

मालक-कर्णधार संबंध महत्त्वाचे

फ्रँचाइजी मालक आणि कर्णधार यांच्यातील संबंध फार महत्त्वपूर्ण ठरतात. मालकांनी समजून घ्यावे की मैदानावर कर्णधार हाच महत्त्वाचा घटक आहे. खेळाडू कितीही मोठा असला तरी मालक आणि कर्णधार यांच्यातील विश्वासावर वाटचाल सोपी होत असते. हे संबंध ‘टू वे ट्रॅफिक’प्रमाणे असायला हवेत. कर्णधाराकडून मालकाच्या अपेक्षा चुकीच्या नाहीत; पण परस्पर विश्वासदेखील महत्त्वपूर्ण ठरतो.

फ्रँचाइजीसाठी संघ म्हणजे ‘बिझनेस एंटरप्रायझेस’ 

फ्रँचाइजी मालक कुणालाही कर्णधार नेमू शकतात, हा त्यांचा हक्क आहे. त्याविषयी वाद होऊ नये. स्पर्धेच्या मध्यातही ते कर्णधार बदलण्याचा हक्क बाळगतात. रोहितलादेखील सत्राच्या मध्येच नेतृत्व सोपविण्यात आले होते, हे विसरता येणार नाही. फ्रँचाइजींचा संघाप्रतीचा दृष्टिकोन व्यावहारिक असतो. त्यांच्यासाठी संघ हा बिझनेस एंटरप्रायझेस’सारखाच असतो. मालक हा संघाबाबत भविष्यकालीन योजना आखतो. लाभ-तोटाही बघतो. ही सामान्य बाब म्हणावी लागेल. आयपीएल हा उद्योग आहे. सध्या तर फ्रँचाइजीची किंमत १५ हजार कोटींवर पोहोचली आहे. सात हजार कोटींहून अधिक किंमत मोजून लखनौ संघ खरेदी करण्यात आला. 

बदल करताना भान राखा, संवाद असू द्या

मुंबई संघाचे मालक हार्दिकसंदर्भात भविष्यातील संघ उभारू इच्छितात. यादृष्टीने लीगमधील बदल तर्कसंगत नाहीत, असे मानू नका. पण, बदल करताना भान हवे. त्यासाठी कर्णधार, खेळाडू आणि मालक यांच्यात संवाद असायला हवा. मुंबईने हार्दिकबाबत हीच चूक  केली. त्याला एक-दोन सत्रांत खेळाडू व त्यानंतर कर्णधार म्हणून पुढे आणले असते तर वाद झाला नसता. पण, फ्रँचाइजीने संवाद न राखल्याने भडका उडाला.

कर्णधाराचा अपमान खेळाडूंना दुखावणारा

लखनौचे मालक आणि राहुलबाबत बोलायचे तर सार्वजनिकरीत्या भडकणे योग्य नव्हते. कॅमेरा सर्व गोष्टी दाखवितो, हे मालकाने समजून घ्यायला हवे होते. राहुलने कधीकाळी भारताचे नेतृत्व केले. तो सामान्य खेळाडू नाही. आयपीएलमध्ये त्याने संघाला दोनदा प्ले ऑफ गाठून दिले आहे. व्हिडिओ पाहून मालकाने राहुलचा क्लास घेतल्याची खात्री पटते. यामुळे चुकीचा संदेश जातो. संघावर विपरीत परिणाम होतो. कर्णधाराचा अपमान खेळाडूंना आवडणारा नाही. यात समजूतदारपणा असावा. चेन्नईचे उदाहरण घ्या. संघ हरल्यानंतरही मालकाने कधीही कर्णधाराला फटकारलेले नाही.

मानवी संवेदनेची गरज

टी-२० तर जय-पराजयाबाबत खात्री नसते. काहीही शक्य आहे. संघाच्या विजयात खेळाडूचे कौशल्य पणाला लागते. मालकांनी अपेक्षा राखावी; पण अपेक्षा सार्वजनिकरीत्या प्रकट करू नये. राहुलला प्रश्न विचारायचेच होते तर हॉटेलच्या खोलीत विचारले जाऊ शकले असते. याबाबतीत मानवी संवेदना बाळगणे गरजेचे आहे.  आमंञणही फ्रँचाइजीला सेवा देतो याचा अर्थ स्वतचा आत्मा विकत नाही, अशी खेळाडूंची भावना आहे. सर्व संघ मालकांसाठी दोन्ही घटना बोधप्रद ठराव्या. यामुळे लीगमध्ये पारदर्शीपणा येईल, मानवी संवेदना जपल्या जातील.

Web Title: tata ipl 2024 expect the captain but do not insult him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.