नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अपयश विसरून भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या लढतीसाठी स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून मुंबईकर अजिंक्य रहाणे याच्याकडे भारताचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. चेतेश्वर पुजारा उपकर्णधार म्हणून रहाणेला साथ देईल. नियमित कर्णधार विराट कोहली मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल.
केवळ कोहलीच नाही, तर हिटमॅन रोहित शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनाही बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, ‘विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघासोबत जुळेल आणि संघाचे नेतृत्व करेल.’ मुंबईचा भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर याच्यासह फिरकीपटू जयंत यादवने भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले आहे. कसोटी मालिकेआधी तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळविण्यात येईल.
यष्टीरक्षक हनुमा विहारी याला भारतीय कसोटी संघातील स्थान गमवावे लागले आहे. त्याचा समावेश डिसेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघात करण्यात आला आहे. या मालिकेत छाप पाडून पुन्हा एकदा भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची संधी विहारीकडे असेल. याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही विहारीला भारत अ संघातून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवीत आहोत. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याच्या कामगिरीवर आमची नजर असेल.’
रहाणेचे नेतृत्व ठरणार निर्णायक
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ३६ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेमुळे मायदेशी परतला होता. त्याच्या अनुपस्थिती अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले. शिवाय मालिकेदरम्यान काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर रहाणेने नवोदित खेळाडूंना हाताशी घेत आपल्या कल्पक नेतृत्वच्या जोरावर भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आता मायदेशातही रहाणे याच नेतृत्व कौशल्याच्या जोरावर भारताला विजयी करेल, अशी चाहत्यांना खात्री आहे.
अय्यरवर मोठी जबाबदारी
मुंबईकर श्रेयस अय्यरला आणखी एक संधी मिळाली असून अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मधल्या फळीला मजबूती देण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल. त्याचप्रमाणे, डावातील दुसऱ्या नव्या चेंडूवर प्रतिआक्रमण करत संघावरील दडपण कमी करण्याची आणखी जबाबदारी त्याच्यावर असेल.
संघात तीन सलामीवीर
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातून एकाचवेळी लोकेश राहुल, मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल हे तीन सलामीवीर खेळतील. या तिघांनाही आपल्या कारकिर्दीत कसोटी सामन्यात किंवा प्रथम श्रेणी लढतीत कधीना कधी मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे तिघांची उपस्थिती भारतीय फलंदाजीला बळकटी देईल.
भारतीय संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
Web Title: Team announced against New Zealand; Rest to Rohit, Pant, Bumrah with Virat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.