- अयाझ मेमन ज्या भारतीय संघाने १९८५ ची जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली तो संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील सध्याच्या संघाला एकदिवसीय सामन्यातील पैशाच्या मोबदल्यात धावा देऊ शकेल असे विधान नुकतेच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. काही जणांचे हे मत वादग्रस्त वाटू शकते. याचा शब्दश: अर्थ घेतला तर लाखो लोकांना हे पटणार नाही. काही लोकांना भूतकाळ रम्यच वाटतो, असाही त्यांचा युक्तिवाद असू शकेल. मात्र, १९८० च्या दशकात युवावस्थेत असणाऱ्यांसाठी हा विजय खूपच विशेष होता. रवी शास्त्री हा त्या संघातील विशेष खेळाडू होता. आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने संघातील सहकारी के. श्रीकांत व पाकिस्तानच्या जावेद मियॉँदाद यांना मागे टाकत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’चा किताब पटकाविला होता.त्याने पुरस्कार रूपात जिंकलेली आॅडी कार त्या काळात खूपच मोठी बाब होती. त्यावेळी क्रिकेटपटूंना वस्तुरूपात पुरस्कार मिळत नसत. त्यामुळे शास्त्रीने पटकाविलेल्या या आलिशान कारने वादळ निर्माण केले होते. त्याने कार जिंकल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसमवेत एमसीजी मैदानावर जो फेरफटका मारला त्याचे छायाचित्र आजही त्याच्या घरी आहे. त्याने जिंकलेल्या आॅडीच्या बॉनेट, छतावर बसलेले भारतीय क्रिकेटपटू असलेले छायाचित्र हे एकदिवसीय क्रिकेटमधील भारताच्या वर्चस्वाचे प्रतीक बनले होते.१९८५ च्या मिनी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत भारत हा एकदिवसीय क्रिकेटमधील गरीब देश म्हणून ओळखला जात होता. १९७५ व १९७९ या दोन विश्वचषक स्पर्धेत भारताला पूर्व आफ्रिकेविरुद्धचाच एकमेव सामना जिंकता आला होता. १९७५ मध्ये झालेल्या सामन्यात सुनील गावसकरने ६० षटके खेळून नाबाद ३६ धावांचा नकोसा विक्रम नोंदविला हेच विशेष होते.१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करण्याचा भीमपराक्रम केला आणि भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या उदयासाठी हा विजय मोलाचा ठरला. भारताने १९८४ मध्ये शारजाह येथे झालेला आशिया चषक व त्यानंतर वर्षभरानंतर तेथेच झालेला रॉथमन्स चषक जिंकण्याची कामगिरी केली होती. मात्र, या दरम्यान १९८५ मध्ये झालेली जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकत भारताने क्रिकेटमधील आपली वाटचाल कशी असेल हे दाखवून दिले होते.एकदिवसीय सामन्यातील दोन महत्त्वाचे प्रयोग यावेळी झाले. सामन्यावेळी खेळाडूंच्या अंगावरील रंगीत कपडे व घरबसल्या प्रक्षेपण यामुळे ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दोनदा पराभव केला. त्यामुळे भारतीयांचा आनंद द्विगुणित झाला होता. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नव्हता, हे विशेष. या स्पर्धेत आयसीसीचे सर्व सदस्य देश सहभागी झाले होते. त्यामुळे १९८३ चा विजय हा ‘योगायोग’ नव्हता हे भारताने सिद्ध केले.म्हणूनच रवी शास्त्री कोहलीच्या संघाला धावेसाठी पैसा देण्याचे आव्हान देऊ शकतात. शब्दश: अर्थ काढला तर सध्याच्या संघाच्या बाजूनेच निकाल लागेल; मात्र त्या काळात भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ होता, हे मान्यच करावे लागेल. हा संघ कागदावरच बलाढ्य होता असे नाही तर त्यांनी सामने जिंकून हे सिद्ध केले होते. जोपर्यंत कोहली आणि त्याचा संघ अशा प्रकारची कामगिरी करीत नाही तोपर्यंत १९८५ व २०२० च्या संघांमध्ये अशा वेगळ्या प्रकारची तुलना होत राहील.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ...त्या संघाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला
...त्या संघाने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला
१९८० च्या दशकात युवावस्थेत असणाऱ्यांसाठी हा विजय खूपच विशेष होता. रवी शास्त्री हा त्या संघातील विशेष खेळाडू होता. आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने संघातील सहकारी के. श्रीकांत व पाकिस्तानच्या जावेद मियॉँदाद यांना मागे टाकत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’चा किताब पटकाविला होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 1:16 AM