क्विन्सटाऊन : विलगीकरणात असलेली स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत भारतीय महिला संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज शनिवारी खेळणार आहे. मालिकेदरम्यान विश्वचषकाआधी संघ संयोजन साधण्यावर भर राहणार आहे. याआधी एकमेव टी-२० लढतीत भारतीय संघ १८ धावांनी पराभूत झाला होता.
पुढील महिन्यात होणारा आयसीसी विश्वचषक महत्त्वाचा असल्याने कर्णधार मिताली राज विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. मिताली म्हणाली, ‘न्यूझीलंडमध्ये नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. लहान मैदाने आणि वेगवान वारे अशा स्थितीत कामगिरी करणे सोपे नाही. भारतीय चाहत्यांना आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दडपणातही दमदार कामगिरी करावीच लागेल.’
मानधना, वेगवान गोलंदाज रेणुकासिंग आणि मेघनासिंग या विलगीकरणात आहेत. अशावेळी विश्वचषक खेळण्यास इच्छुक असलेल्या अन्य खेळाडूंसाठी ही संधी असेल. सलामीला शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया, तर मधल्या फळीत स्वत: मितालीवर धावा काढण्याची जबाबदारी राहील. हरमनप्रीत कौर हिच्यावरदेखील फोकस राहणार आहे. गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्रकार यांच्यावर मुख्य भिस्त राहील. न्यूझीलंड संघाचा वन डे रेकॉर्ड खराब आहे. त्यांनी २० पैकी एकच सामना जिंकला. कर्णधार सोफी डिव्हाईनदेखील संघ बांधणीस इच्छुक आहे, सुजी बेट्स आणि डिव्हाईन यांनी टी-२० सामन्यात चांगली सुरुवात केली होती.