अभिषेक नायर - डावखुरा फलंदाज आणि जलदगती गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा मुंबईकर अभिषेक नायर पहिल्या तीन पर्वांमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला. २०११ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सकडून नायर खेळला आहे. २०१४ पासून तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये आणखी किमान १० खेळाडू असे आहेत जे चार संघांकडून खेळले आहेत.
आशिष नेहरा - फिटनेस अभावी भारतीय संघातून डच्चू मिळालेला आशिष नेहरा आता आयपीएलमध्ये स्थिरावला आहे. या डावखुरा गोलंदाजाने पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व केले. २००९ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स २०१३ मध्ये पुन्हा दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये स्थान मिळाले. २०१४ पासून नेहरा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
रॉबिन उथप्पा - आयपीएलमध्ये रॉबिन उथप्पाही आत्तापर्यंत चार संघांकडून खेळला आहे. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्स त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांकडून तो खेलला. २०११ मध्ये त्याला पुणे वॉरियर्सने घेतले. २०१४ पासून उथप्पा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे.
शिखर धवन - दबंग क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध असलेला शिखर धवन आयपीएलमध्ये आत्तापर्यंत चार संघांकडून खेळला आहे. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स २००९ व २०१० मध्ये मुंबई इंडियन्स व २०११ ते २०१२ या कालावधीत डेक्कन चार्जर्स या संघांकडून तो खेळला आहे. गेल्या तीन पर्वांपासून तो सनरायडर्स हैदराबादकडून खेळत आहे.
युवराज सिंग - आयपीएलमधील मिलीयन डॉलर क्रिकेटर म्हणून प्रसिद्ध असलेला युवराज सिंग त्याच्या विस्फोटक खेळासाठी प्रसिद्ध असल्याने प्रत्येक संघमालकाला युवराज हवा असतो असे दिसते. आयपीएलच्या सुरुवातीच्या पर्वात युवराज सिंग किंग्स इलेव्हन पंजाब आणि पुणे वॉरियर्सकडून खेळला. २०१४ मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्सने १४ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. आता २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने युवराजला १६ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले.
अॅरोन फिंच - ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅरोन फिंच आयपीएलमध्ये सर्वाधिक संघाकडून खेळणा-यांच्या यादीत दुस-या स्थानावर आहे. फिंचने आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स दिल्ली डेअरडेव्हिल्स पुणे वॉरियर्स आणि सनरायडर्स हैदराबाद या संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यंदाच्या हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मात्र पार्थिव पटेल व फिंच हे दोघे आत्तापर्यंत एकदाही कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेले नाहीत हे देखील विशेषच.
आयपीएलमध्ये क्रिकेटपटूंवर कोट्यावधींच्या बोली लागत असून काही खेळाडूंचे संघ दरवर्षी बदलत असतात. यात सर्वात अग्रस्थानी आहे पार्थिव पटेल. पार्थिव पटेल आत्तापर्यंत झालेल्या आठ पर्वांमध्ये सहा संघांकडून खेळला आहे. पार्थिवने २००८ ते २०११ चेन्नई सुपर किग्ज त्यानंतर कोच्ची टस्कर्स मग डेक्कन चार्जस २०१४ मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरु आणि यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून तो खेळत आहे. अशाच काही खेळाडूंचा घेतलेला हा आढावा...