केपटाउन : महेंद्रसिंग धोनीने गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात २०११ चा वनडे विश्वचषक जिंकला होता. पण, पुढील चषक जिंकण्याची प्रतीक्षा इतकी लांबलचक होईल, असे त्यावेळी कुणाच्या ध्यानीमनी नसावे. माजी कोच कर्स्टन यांच्या मते, ‘सध्याचा भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा संपविण्यास सक्षम वाटतो. यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाने ही प्रतीक्षा संपू शकते.’
कर्स्टन हे २००८ ते २०११ या कालावधीत भारताचे मुख्य कोच राहिले. ते म्हणाले, ‘माझ्या मते विश्वचषक जिंकणे सोपे नाही. अन्य संघांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक वेळा ही कामगिरी केली आहे, पण भारतीय संघदेखील यशोशिखरावर पोहोचण्यास सक्षम वाटतो. भारत लवकरच जेतेपदाची प्रतीक्षा संपविणार असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. २०२३ ला घरच्या मैदानावर वनडे विश्वचषकाचे जेतेपद हुकल्यानंतर वेस्ट इंडीज-अमेरिकेत आयोजित टी-२० विश्वचषकात किमान प्रतीक्षा संपू शकेल का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘अर्थात! भारत प्रतीक्षा संपवू शकतो, कारण त्यांच्याकडे अशी कामगिरी करणारे खेळाडू आहेत. विश्वचषक जिंकण्यासाठी बरेच काही करण्याची गरज असते. विशेषत: बाद फेरीच्या सामन्यात काहीही घडू शकते.’
वनडे विश्वचषकाची गरजकारकिर्दीत १८५ वनडेत ६,७९८ धावा काढणारे कर्स्टन यांनी ५० षटकांचे सामने जिवंत राहावेत, यावर भर दिला. ५६ वर्षांचे कर्स्टन म्हणाले, ‘मला ३-४ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धा आवडतात, त्याचवेळी द्विपक्षीय मालिका अनेकदा अप्रासंगिक ठरतात. त्यामुळे गुण देण्याची व्यवस्था करीत यात चुरस निर्माण करता येईल. अलीकडे भारतात झालेला वनडे विश्वचषक कमालीचा यशस्वी ठरला. मी स्वत: अनेक सामन्यांचा रोमांच अनुभवला. या प्रकारात मी अनेक सामने खेळलो आहे.’
लीग म्हणजे स्वप्नपूर्तीलीग विरुद्ध राष्ट्रीय संघ यावर भाष्य करताना कर्स्टन म्हणाले, ‘सर्वांना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळत नाही. संधी हुकलेल्या प्रतिभावान खेळाडूंना आपली स्वप्ने साकार करण्याचे योग्य व्यासपीठ म्हणजे लीग क्रिकेट! यात व्यावसायिक खेळ होत असल्याचे पाहून बरे वाटते. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे कोच असलेले कर्स्टन यांना भारतीय संंघासोबत पुन्हा जुळण्याची इच्छा आहे का, असे विचारताच त्यांनी थेट उत्तर टाळले.