आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) २०२३-२५ चक्रातील सर्वात महत्त्वपूर्ण कसोटी मालिका २२ नोव्हेंबर पासून पर्थच्या मैदानातून सुरु होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या कसोटी मालिकेत यावेळी ४ ऐवजी ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेच्या निकालावर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सलग तिसरी फायनल खेळणार की नाही याचा फैसला होणार आहे.
पर्थमध्ये टीम इंडियाचा सीक्रेट कॅम्प
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाने पर्थ येथील WACA (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन) च्या मैदानात सीक्रेट ट्रेनिंग कॅम्प लावला आहे. WACA स्टेडियमच्या चारी बाजूंनी नेट्स लावण्यात आले आहे. सामान्य नागरिकांसाठी या परिसरात नो एन्ट्रीची पाटी लागली आहे. टीम इंडियातील विराट कोहली सर्वात आधी पर्थमध्ये पोहचला होता. त्यानंतर संघातील अन्य सदस्य या ठिकाणी पोहचले आहेत.
स्टेडियम लॉकडाउन; याआधीही दिसला होता अगदी असाच माहोल
द वेस्ट ऑस्ट्रेलियनच्या वृत्तानुसार, , WACA स्टेडियम सध्या लॉकडाउन आहे. भारतीय संघाच्या प्रॅक्टिस सेशनसाठी तयार करण्यात आलेला माहोल हा २०२२ च्या आठवणीला उजाळा देणारा आहे. २०२२ मध्ये टी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ पर्थच्या या मैदानात आला होता. यावेळीही स्टेडियमला सर्व बाजूंनी नेट्सच्या माध्यमातून कव्हर करण्यात आले होते. सामान्य नागरिकांना इथं येण्यास बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही तर स्टेडियममधील कर्मचाऱ्यांनाही फोन वापरण्याची परवानगी नव्हती.
प्रॅक्टिस मॅच न खेळता थेट मैदानात उतरणार आहे टीम इंडिया
भारतीय संघाने पर्थ कसोटी सामन्याआधी प्रॅक्टिस मॅच न खेळता सरावाला पसंती दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया थेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासह मालिकेला सुरुवात करताना दिसेल. दोन आठवड्या आधीच भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. पण कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असणार नाही, असे दिसते. त्याच्या ऐवजी पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.