मुंबई - भारतीय क्रिकेटमधील किंग कोहलीच्या कप्तानीचं विराटयुग समाप्त झालं आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीनं भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावरून अव्वलस्थानावर पोहोचवले होते. दरम्यान, टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघांचं नेतृत्व विराट कोहलीने गेल्या तीन महिन्यात एका ओळीत सोडलं आहे. विराट आणि बीसीसीआयमध्ये तीव्र मतभेद असल्याची चर्चा होती. आरोप-प्रत्यारोपही होत होते. आता केवळ एक खेळाडू म्हणून विराट कोहली भारतीय संघातून खेळणार आहे. दरम्यान, विराट कोहलीने टी-२० आणि वनडे संघांचं नेतृत्व सोडल्यानंतर त्या संघांचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं होतं. तर मात्र आता विराटने कसोटी संघाचंही कर्णधारपद सोडल्याने वनडे संघाचा कर्णधार कोण होणार, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
विराट कोहलीनंतर आता वनडे आणि टी-२० संघांप्रमाणेच कसोटी संघाचीही धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्माऐवजी लोकेश राहुलचं नाव आघाडीवर आहे. रोहित शर्माचा फिटनेस हा चिंतेचा विषय असून, तो अनेकदा संघाबाहेर होत असतो, ही बाब रोहित शर्माच्या विरोधात जाणारी आहे. त्यामुळे अशा कठीण काळात बोर्डाकडून रोहित शर्माकडे नेतृत्व देण्याची शक्यता कमी आहे. मात्र कर्णधारपदासाठी रविचंद्रन अश्विनचं नावही आघाडीवर आहे. मात्र गोलंदाजाकडे नेतृत्व देण्याबाबत आपल्याकडे कमालीचे पूर्वग्रह असल्याने त्याचे नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत मागे पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय संघातील ज्येष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणे हा त्याचा फॉर्म चांगला राहिला असता तर कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहिला असता. ऑस्ट्रेलियात मिळवून दिलेल्या ऐतिहासिक विजयानंतर तसाही तो कर्णधार म्हणून सर्वांच्या पसंतीस उतरला असता. मात्र त्याचे सध्या संघातील स्थानच पक्के नसल्याने त्याचे नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत मागे पडले आहे.
त्यातच अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचे संघातील स्थान आफ्रिका दौऱ्यातील सुमार कामगिरीमुळे मागे पडले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये या दोघांचीही निवड होणे कठीण दिसत आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेचा बचाव केला होता. मात्र असं असलं तरी या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंची संघात निवड होणे कठीण आहे. त्यांच्याऐवजी श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि शुभमन गिल यांची निवड होऊ शकते.