जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर झाली आहे. रणजी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीनंतर आयपीएलमध्ये स्फोटक खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या कामगिरीची दखल निवड समितीने घेतली असून, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
२०२२ च्या सुरुवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात आले होते. दरम्यान, बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या मध्यवर्ती करारांमध्येही रहाणेला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात होते. मात्र आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत अजिंक्य रहाणेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यातच श्रेयस अय्यरला झालेली दुखापत आणि सूर्यकुमार यादवकडे कसोटी क्रिकेटचा नसेलला पुरेसा अनुभव यामुळे या अंतिम सामन्यासाठी निवड समितीने अनुभवी रहाणेला संघात स्थान दिलं आहे.
अंतिम सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि के.एल. राहुल असे तीन सलामीवीर संघात असतील. तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर मधल्या फळीची धुरा असेल. अजिंक्य रहाणेसोबतच शार्दुल ठाकूरलाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची धुरा पुन्हा एकदा के.एस. भरतकडे सोपवण्यात आली आहे. तर रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल अशा तीन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.