Tilak Varma IPL 2024: आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्या १५ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या हंगामातील पहिला सामना २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना २४ मार्च रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. आयपीएलला सुरूवात होण्यापूर्वी मुंबईचा युवा शिलेदार तिलक वर्माने त्याच्या स्फोटक खेळीने कहर केला. डीवाय पाटील ट्वेंटी-२० चषकाच्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतक झळकावले आहे.
तिलकने सेंन्ट्रल रेल्वे संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. त्याने ४४ चेंडूत ९१ धावा केल्या. या काळात त्याने श्वालिक शर्मासोबत १२२ धावांची भागीदारीही नोंदवली. या सामन्यात तिलक वर्माच्या संघाने निर्धारित षटकांत २२० धावा केल्या. फलंदाजीनंतर त्याने गोलंदाजीतही कमाल दाखवत एक बळी पटकावला.
तिलक वर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबईकडून खेळतानाही त्याने अनेकदा दमदार कामगिरी केली आहे. तिलकने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या २५ आयपीएल सामन्यांमध्ये ७४० धावा केल्या आहेत. या काळात त्याने ३ अर्धशतकेही झळकावली आहेत. तिलकची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ८४ ही आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या एकूण ७० ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये २०४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १३ अर्धशतके झळकावली.
आयपीएल २०२४ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचे चार सामने आहेत. मुंबईचा पहिला सामना गुजरातविरुद्ध आहे. हा सामना २४ मार्च रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. यानंतर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना २७ मार्च रोजी खेळवला जाईल. स्पर्धेतील मुंबईचा तिसरा सामना १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. तर ७ एप्रिलला मुंबई आणि दिल्ली यांच्यात लढत होईल.
Web Title: Team India and Mumbai Indians player in IPL Tilak Verma scored 91 off 44 balls against Central Railway in DY Patil T20 Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.