नवी दिल्ली-
भारतीय क्रिकेट संघात लवकरच दोन घातक गोलंदाजांची एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलमध्ये दोन युवा गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचं दार ठोठावण्याची आपली दावेदारी सिद्ध केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीलाही या दोन गोलंदाजांनी भुरळ घातली आहे. 'दादा'नंही दोन नव्या गोलंदाजांना भारतीय संघात संधी देण्याचे संकेत दिले आहेत.
आयपीएलनंतर भारतीय संघाचं भरगच्च वेळापत्रक आहे. आयपीएल संपल्याच्या दहा दिवसानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि द.आफ्रिकेत ९ जून ते १९ जून या कालावधीत ट्वेन्टी-२० सीरिज खेळवली जाणार आहे.
द.आफ्रिके विरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यात २६ ते २८ जूनमध्ये भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. तर जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ १ कसोटी, ३ वनडे आणि ३ ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील एक कसोटी सामना होऊ शकला नव्हता. तोच सामना खेळवला जाणार आहे.
लवकरच संघात दोन घातक गोलंदाजबीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एक सूचक विधान केलं. जर भारतीय संघात युवा गोलंदाज उमरान मलिक याची निवड झाली तर आश्चर्य वाटायला नको, असं गांगुलीनं म्हटलं आहे. "किती गोलंदाज १५० किमी प्रतितास या वेगानं गोलंदाजी करतात? जास्त नाहीतच कुणी. जर उमरान मलिकची भारतीय संघासाठी निवड केली गेली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही", असं गांगुली म्हणाला.
आयपीएलमध्ये उमरान मलिकनं नवा रेकॉर्ड करत चक्क १५७ किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केली आहे. उमरान सातत्यानं १५० किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करू शकतो. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन देखील उत्तम गोलंदाजी करताना दिसला आहे, असंही गांगुलीनं म्हटलं. कुलदीप सेन आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये उत्तम गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आहे.
गोलंदाजांच्या कामगिरीवर गांगुली खूश"उमरान मलिक सर्वात वेगवान गोलंदाज आहे. आपल्याला त्याचा वापर खूप काळजीपूर्वक करावा लागेल. कुलदीप सेन देखील माझा आवडता गोलंदाज आहे. तसंच टी.नटराजननं देखील पुनरागमन केलं आहे. आपल्याकडे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह देखील आहेत. त्यामुळे मी भारताच्या वेगवान गोलंदाजांचा दबदबा पाहता खूप खुश आहे", असं सौरव गांगुली म्हणाला.