अॅलिस्टर कुकला इंग्लंडचा विजयी निरोप, टीम इंडियाचा 118 धावांनी पराभव

इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामनाही इंग्लंडने जिंकला. त्यामुळे या मालिकेत 4-1 अशा फरकाने भारताला विराट पराभव पत्कारावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 10:44 PM2018-09-11T22:44:32+5:302018-09-12T06:20:41+5:30

whatsapp join usJoin us
Team India beat by 118 runs, Ex skipper Alastair Cook get grand sendoff by team england with victory | अॅलिस्टर कुकला इंग्लंडचा विजयी निरोप, टीम इंडियाचा 118 धावांनी पराभव

अॅलिस्टर कुकला इंग्लंडचा विजयी निरोप, टीम इंडियाचा 118 धावांनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कूक याला संघाने भारताचा ११८ धावांनी पराभव करत विजयी निरोप दिला. इंग्लंडच्या ४६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव ३४५ धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर लोकेश राहूल (१४९) आणि रिषभ पंत (११४) यांची शतके व्यर्थ ठरली. आपल्या अखेरच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या कूकला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
मंगळवारी सकाळी ४६ धावांवरून खेळताना राहूलने सकारात्मक फलंदाजी केली. त्याने कोणताही दबाव न घेता फटके खेळले. पंतने सुरूवातीला सावधपणे खेळ केला. मात्र नंतर नैसर्गिक आक्रमक फलंदाजी केली. भारताच्या दोन्ही फलंदाजांनी फिरकीविरुद्ध सहज धावा काढल्या. त्यामुळे भारताची धावगती वाढली. राहूलने उपहाराच्या आधी ११८ चेंडूत शतक पुर्ण केले. गेल्या दोन वर्षातील हे त्याचे पहिले आणि एकूण पाचवे शतक ठरले. इंग्लंडमध्ये चौथ्या डावात शतक झळकवणारा तो केवळ दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. सुनिल गावसकर यांनी या मैदानात १९७९ मध्ये २२१ धावा केल्या होत्या.
पंतने आदिल राशिदच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत आपले पहिले शतक पूर्ण केले. त्याने ११७ चेंडूत १४ चौकार आणि एक षटकार मारला. इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पंत पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला. या आधी महेंद्रसिंग धोनीची ९७ धावांची खेळी ही भारतीय यष्टीरक्षकाची सर्वोच्च खेळी होती.
राहूल आणि पंत खेळत असताना काही वेळ रुट याने अँडरसन आणि ब्रॉड या आपल्या मुख्य गोलंदाजांना चेंडू सोपवला नाही. पंतने स्टोक्सच्या एकाच षटकात तीन चौकार लगावले. राहूलने २२४ चेंडूचा सामना करत १४९ धावा केल्या, तर पंत याने १४६ चेंडूत ११४ धावा केल्या. आदिल राशिदने राहूलला बाद करत ही जोडी फोडली. राहूल याने आपल्या खेळीत १ षटकार आणि १९ चौकार लगावले. दोघांनी २०४ धावांची भागिदारी केली. नंतर लगेचच पंतही बाद झाला.
त्यानंतर तळाचे फलंदाज फार वेळ तग धरु शकले नाहीत. इंग्लंडने नवा चेंडू घेतल्यावर भारतीय फलंदाजांना टिकुन खेळणे शक्य झाले नाही. पहिल्या सत्रात भारताने दोन गडी गमावले. रहाणेला मोईन अलीने बाद केले. त्या आधी राहूलने उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह (३७) शतकी भागिदारी केली. त्याचवेळी हनुमा विहारीला खाते देखील उघडता आले नाही. (वृत्तसंस्था)
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज याने विश्वविक्रमाला गवसणी घालताना क्रिकेटविश्वातील सर्वाधिक कसोटी बळी मिळवणारा वेगवान गोलंदाजाचा मान मिळवला. अँडरसने दुसºया डावात भारताचा अखेरचा फलंदाज मोहम्मद शमीला बाद करत आपली एकूण कसोटी बळींची संख्या ५६४ अशी केली. यासह त्याने आॅस्टेÑलियाचा दिग्गज ग्लेन मॅकग्रा (५६३) याला मागे टाकले.
>संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद ३३२, भारत (पहिला डाव) : सर्वबाद २९२, इंग्लंड (दुसरा डाव) : ११२.३ षटकात ८ बाद ४६४ घोषित, भारत (दुसरा डाव) : ९४.३ षटकात सर्वबाद ३४५ धावा (लोकेश राहूल १४९, अजिंक्य रहाणे ३७, रविंद्र जडेजा १३, रिषभ पंत ११४ ; जेम्स अँडरसन ३/४५, सॅम कुरन २/२३, आदिल रशिद २/६३, स्टुअर्ट ब्रॉड १/४३, मोईन अली १/६८, बेन स्टोक्स १/६०.)



 

Web Title: Team India beat by 118 runs, Ex skipper Alastair Cook get grand sendoff by team england with victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.