Asian Cricket Council Under-19s Asia Cup - भारतीय संघाने आजपासून सुरू झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने ७ विकेट्स व ७५ चेंडू राखून बाजी मारली. भारताच्या या विजयात सोलापूरचा अर्शीन कुलकर्णी ( Arshin Kulkarni) याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने नाबाद ७० धावा केल्या, शिवाय ३ विकेट्स घेतल्या. १८ वर्षीय अर्शीनला टीम इंडियाचा भविष्याचा स्टार ऑल राऊंडर म्हणून संबोधले जात आहे.
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना अफगाणिस्तानच्या धावांचा ओघ आटवला आणि त्या दडपणात फलंदाजांनी विकेट फेकल्या. सलामीवीर जमशीद झाद्रान ( ४३) , अक्रम मोहम्मदझाई ( २०), नुमन शाह (२५) आणि मोहम्मद युनुस ( २६) यांनी अफगाणिस्तानकडून चांगल्या धावा केल्या. अर्शीनने ८ षटकांत २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. राज लिंबानीने ४६ धावांत ३, तर नमन तिवारीने ३० धावांत २ बळी टिपले. मुरुगन अभिषेक व मुशीर खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
फलंदाजीत सलामीला येताना अर्शीनने १०५ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या. कर्णधार उदय सहारनने २० धावा केल्या. मुशीर खाननेही अष्टपैलू कौशल्य दाखवताना १ विकेटनंतर फलंदाजीत ५३ चेंडूंत नाबाद ४८ धावा केल्या. भारताने ३७.३ षटकांत ३ बाद १७४ धावा करून विजय पक्का केला. १० तारखेला भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान आहे. त्यांनीही आज नेपाळविरुद्ध विजयाने सुरुवात केली.