सेंच्युरियन : यजमान द. आफ्रिकेविरुद्ध २६ डिसेंबरपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे. त्याची तयारी शनिवारी भारतीय खेळाडूंनी तब्बल १४०० मीटर उंच स्थानावर ‘फुटव्हॉली’(फुटबॉल आणि व्हॉलिबॉल) खेळाद्वारे सुरू केली. कसोटी मालिकेला सामोरे जाण्याआधी परिस्थितीशी एकरुप होण्याचा संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघ तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर शुक्रवारी सकाळी चार्टर्ड विमानाने येथे दाखल झाला. येथील रिसॉर्टमध्ये खेळाडूंना एक दिवस थांबून सराव सुरू करायचा होता.
बीसीसीआयने ट्विट केलेल्या व्हिडीओत संघातील खेळाडू ‘फुटव्हॉली’चा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही समावेश होता. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव वाढताच ही मालिका संकटात सापडली होती. मात्र, उभय बोर्डांच्या परस्पर संमतीने मालिकेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. संपूर्ण मालिकेदरम्यान बायोबबलचे कठोरपणे पालन केले जाईल. येथे पंचतारांकित हॉटेल नसले तरी रिसॉर्टमध्ये खेळाडूंच्या मनोरंजनाची आणि फेरफटका मारण्याची पुरेशी व्यवस्था आहे.
खेळाडू बायोबबलबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. याविषयी भारतीय संघाचे ‘स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग कोच’ सोहम देसाई म्हणाले, ‘आम्ही मुंबईत तीन दिवस क्वारंटाईन होतो. यानंतर दहा तासांचा विमान प्रवास झाला. कालदेखील कठोरपणे क्वारंटाईन व्हावे लागले. अशावेळी खेळाडूंसाठी आजचे सत्र थोडे जोखमीचे होते.
सर्वांनी थोडावेळ दौड केली. पाठोपाठ स्ट्रेचिंग करत घाम गाळला. उद्या सरावाला सुरुवात होईल. हे स्थळ समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंचीवर आहे. खेळाडूंना येथे एकरुप होण्यास दोन-तीन दिवस लागू शकतील.’
‘फुटव्हॉली’ हा भारतीय खेळाडूंचा आवडता खेळ असल्याचे सांगून देसाई म्हणाले, ‘भारतीय क्रिकेट संघासाठी हा खेळ सरावाचा एक भाग बनला आहे. आम्ही खेळाडूंना अनेक पर्याय सुचवतो, मात्र ते फुटव्हॉलीची निवड करतात. यामुळे खेळाडूंना आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते.’