Join us  

टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ६ बाद २९७ धावा केल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 10:45 PM

Open in App

भारतीय संघानं हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यातील विजयासह टीम इंडियानं पाहुण्या बांगलादेश संघाला क्लीन स्वीप दिली आहे. भारतीय संघाने ३४ व्या मालिकेत १० व्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. अशी कामगिरी अन्य कोणत्याही संघाला जमलेली नाही. यासह  टीम इंडियाने अनेक विक्रम या सामन्यात नोंदवल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघानं १३३ धावांनी जिंकला तिसरा सामना

पहिल्यांदा बॅटिंग करताना संजू सॅमसनचं शतक आणि सूर्यकुमार यादवसह अन्य फलंदाजांनी तोऱ्यात केलेली बॅटिंगच्या जोरावर भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ६ बाद २९७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाने कसा बसा दिडशेचा पल्ला गाठला. पण विजयासाठी आवश्यक धावसंख्येपासून ते खूपच लांब राहिले. निर्धारित २० षटकात बांगलादेशच्या संघाला ७ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने हा सामना १३३ धावांनी जिंकला. 

धावांचा पाठलाग करताना तौहिदचं अर्धशतक, भारताकडून बिश्नोईनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स

भारतीय संघाने ठेवलेल्या डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाकडून तौहीद ह्रिदोय याने अर्धशतकी खेळी केली. त्याच्याशिवाय लिटन दास याने २५ चेंडूत केलेली ४२ धावांची खेळी वगळता अन्य कोणत्याही फंलदाजाला मैदानात तग धरता आला नाही. गोलंदाजीत  भारताकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मयंक यादवनं २ तर वॉशिंग्टन सुंदर आणि नितेश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.  

दसऱ्या दिवशी टीम इंडियाची विजया दशमी! इथं पाहा खास रेकॉर्ड

  • भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या ३४ द्विपक्षीय टी मालिकेमध्ये १० मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.
  • या यादीत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. ३२ द्विपक्षीय टी-२० मालिकेत त्यांनी ८ वेळा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप केलं आहे.
  • अफगाणिस्तानच्या संघाने  १६ द्विपक्षीय टी-२० मालिकेत  ६ वेळा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप केल्याचा रेकॉर्ड आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या संघाने  २५ द्वपक्षीय टी-२० मालिकेत  ५ वेळा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप दिली आहे.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ