नवी दिल्ली: बीसीसीआयने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआय पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेट संघ टी-२० प्रकारातील आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवणार आहे.
२३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन होईल. ३० जूनपूर्वी बीसीसीआय आशियाई क्रीडा स्पर्धेत जाणाऱ्या संघातील खेळाडूंची यादी पाठवेल. २०१० आणि २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाला पाठविण्यात आले नव्हते.
२०१० आणि २०१४ मध्ये आशियाई खेळांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये क्रिकेट स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने आपल्या पुरुष आणि महिला संघाला पाठविले नव्हते. चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकात क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. २०१८ मध्ये जकार्ता येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे आयोजन करण्यात आले नव्हते.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघाला क्रिकेट स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.