Team India Announced for T20 World Cup 2024 : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची मंगळवारी घोषणा केली गेली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची रविवारी नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. त्यानंतर मंगळवारी आगरकर व द्रविड यांनी BCCI चे सचिव जय शाह यांची अहमदाबाद येथे भेट घेतली. त्यांच्यातल्या बैठकीनंतर लगेचच बीसीसीआयने वर्ल्ड कप साठी संघ जाहीर केला. हार्दिक पांड्याने संघातील आपले स्थान टिकवले आहे.
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
रोहितसोबत यशस्वी जैस्वाल सलामीला खेळेल हे पक्के झाले आहे. स्ट्राईक रेटवरून टीका होणारा विराट कोहली संघात आपले स्थान टिकवून आहे, तर सूर्यकुमार यादवनेही आपली जागा पक्की केली आहे. शिवम दुबे व संजू सॅमसन यांना दिल्या गेलेल्या संधीचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. पण, त्याचवेळी रिंकू सिंगला राखीवमध्ये जागा मिळाल्याने नाराजी आहे. मुकेश कुमार , रवी बिश्नोई यांनाही संधी न मिळाल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण, बीसीसीआयने जाहीर केलेल्या आज संघात बदल होऊ शकतो, तसे अपडेट्स समोर येत आहेत.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड येथे होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान ( ९ जून), अमेरिका ( १२ जून) व कॅनडा ( १५ जून) असे भारताचे सामने होणार आहेत. १ मे ही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे आणि आज भारताच्या आधी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड यांनी संघ जाहीर केले आहेत. पण, आयसीसीच्या नियमानुसार २५ मे पर्यंत या संघांमध्ये बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे भारताच्या संघातही बदल होऊ शकतो.
भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद.