Team India Planning, IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या संघाने भारताविरूद्ध सुरू झालेल्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने प्रथम इंग्लंडला फलंदाजीची संधी दिली होती. त्यावेळी इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. पण दुसऱ्या डावात इंग्लंडच्या ओली पोपने एकाकी १९६ धावाची खेळी केली. त्यानंतर २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडने २०२ धावांतच गुंडाळले आणि सामना भारताच्या हातून हिसकावून घेतला. या पराभवानंतर आता भारताला आपल्या भूमीवर विजयी लयीत परतायचे असेल आणि मालिका नावावर करायची असेल तर त्यांनी तीन वर्षांपूर्वीची रणनीति पुन्हा वापरावी लागेल.
हैदराबादच्या पराभवातून टीम इंडियाने धडा घेतला असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरित ४ कसोटी सामन्यांमध्ये हे घडू नये म्हणून टीम इंडिया ३ वर्षांपूर्वीची युक्ती आजमावताना दिसू शकते. तीन वर्षे जुनी युक्ती म्हणजे पूर्णपणे टर्निंग पिच बनवणे. याच रणनीतीने भारत ३ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ०-१ अशा पिछाडीवरून ३-१ अशा फरकाने मालिका जिंकला होता.
यावेळीही नेमकी तीच परिस्थिती आहे. भारताने ५ कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला आहे आणि ०-१ ने मागे पडला आहे. पण, तरीही त्याला मालिका ४-१ अशी जिंकण्याची संधी आहे. त्यासाठी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या कसोटीत टर्निंग पिच बनवाव्या लागतील. असे करण्यात काहीच गैर नाही असे काही तज्ज्ञांचे मत आहे. कारण, प्रत्येक संघ आपली बलस्थाने लक्षात घेऊन खेळपट्टी बनवू शकतो. अशा स्थितीत भारताने पुन्हा तीच युक्ती वापरली तर त्यात नवल वाटण्याचे कारण नाही.
Web Title: Team India can use the 3 years old formula to win the IND vs ENG Test series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.