नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत वीरेंद्र सेहवागने एक मोठं वक्तव्य केलंय. जर युवा खेळाडूंना महेंद्र सिंह धोनीच्या मार्गदर्शनात प्रशिक्षित केलं गेलं, तर वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विजय मिळवू शकते, असे सेहवाग म्हणाला. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सेहवाग बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, एक युवा खेळाडू म्हणून मी माझा पहिला वर्ल्ड कप सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यासोबत २००३ मध्ये खेळला होता. हे सगळेच मला मदत करत होते.
सेहवाग धोनीचं कौतुक करत म्हणाला की, 'धोनीने आपल्या शानदार खेळीने आणि रणनीतिने टीम इंडियाला २०११ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन केलं होतं. सध्याची टीम ही युवा खेळाडूंची आहे आणि त्यांच्याकडे धोनीसारखा अनुभवी खेळाडू आहे. धोनी त्यांना मार्गदर्शन करू शकतो. २०१९ वर्ल्ड कपसाठी त्यांना तयारही करू शकतो'.
२०११ च्या वर्ल्ड कपमधील अनुभवाबाबत बोलताना सेहवाग म्हणाला की, या स्पर्धेच्या दोन वर्षआधी आमची एक बैठक झाली होती. प्रत्येक सामन्याकडे नॉकआउट सामन्याप्रमाणेच बघायचे असे आम्ही या बैठकीत ठरवले होते. आमचा पराभव झाला तर आम्ही स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळेच आम्ही सर्व सामने जिंकले आणि फायनलमध्ये पोहोचलो. याप्रकारेच आम्ही तयारी केली होती.