Harmanpreet Kaur, India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश महिला संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात निकालापेक्षा अंपायरिंगवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. एवढेच नाही तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरवरही बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. आता बांगलादेशच्या कर्णधारानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सामना बरोबरीत
मालिकेतील या तिसऱ्या वनडेत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात 225 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली, याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ 49.3 षटकात 225 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी सलामीवीर फरजाना हकने १०७ धावांची उत्कृष्ट खेळी केली, तर भारताकडून सलामीवीर स्मृती मानधना (५९) आणि हरलीन देओल (७७) यांनी अर्धशतके झळकावली.
हरमनप्रीतवर येऊ शकते बंदी
या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने असे काही केले की तिला ते महागात पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान ती अंपायरिंगबद्दल खूप चिडलेली दिसत होती. सामना संपल्यानंतरही तिने अंपायरिंगवर टीका केली. खरे तर नाहिदा अख्तरच्या चेंडूवर हरमनप्रीतला अंपायरने झेलबाद घोषित केले. चेंडू तिच्या पॅडला लागला आणि स्लिप क्षेत्ररक्षकाकडे गेला असे वाटत असले तरी. हरमनप्रीत कौर अंपायरच्या निर्णयावर नाराज झाली आणि तिने तिची बॅट स्टंपवर आपटली. त्यानंतर तिने याबाबत उघडपणे प्रतिक्रियाही दिली.
बांगलादेशी महिला कर्णधारानेही दिली प्रतिक्रिया
बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानानेही या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. ती म्हणाला, 'जे घडलं ती पूर्णपणे हरमनप्रीत कौरची चूक आहे. तिला भावनांना आवर घालणे जमलं पाहिजे. मी याबद्दल काहीही करू शकत नाही. मला वाटतं तिने थोडं सुसंस्कृत वागायला हवं होतं."
दरम्यान, सामना टाय झाल्यामुळे ही मालिका देखील 1-1 अशी बरोबरीत संपली.