Join us  

वन डे वर्ल्ड कपमधील पराभवावर बोलताना भारतीय कर्णधार रोहित भावूक, म्हणाला...

The Kapil Sharma Show Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 1:14 PM

Open in App

Rohit Shama News: मागील वर्षी पार पडलेल्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात यजमान भारतीय संघाचा पराभव झाला अन् तमाम भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. स्पर्धेतील सर्व सामने जिंकून टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने कधीच उघडपणे भाष्य केले नव्हते. पण, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये बोलताना हिटमॅनने विश्वचषकातील पराभवावर भाष्य केले आहे. (ODI World Cup 2023) 

कपिल शर्मा शोमध्ये पाहुणे म्हणून भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली. शोमध्ये रोहित शर्माने विश्वचषक २०२३ बद्दल देखील भाष्य केले आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहितने भावनिक प्रतिक्रिया दिली. रोहित म्हणाला की, भारतीय संघाने विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. पण अखेरच्या सामन्यात झालेल्या काही चुकांमुळे सामना हातून निसटला. आम्ही सामन्यापूर्वी दोन दिवस अहमदाबादला पोहोचलो होतो. आम्ही चांगला सराव केला होता. अंतिम सामन्यात शुबमन गिल लवकर बाद होऊनही आम्ही चांगली सुरुवात केली. मी आणि विराट कोहलीने डाव सावरला. मला वाटते की, आपण जेव्हा मोठ्या सामन्यांमध्ये धावा करतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघावर दडपण येते. १०० धावा असल्या तरी त्यांना त्याचा पाठलाग करायचा असतो. पण ऑस्ट्रेलियाने चांगले क्रिकेट खेळले. पण, पराभवानंतर आम्ही जिथे जिथे गेलो तिथे चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. 

वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेकिचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले.  विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला. 

टॅग्स :द कपिल शर्मा शोकपिल शर्मा रोहित शर्माश्रेयस अय्यरवन डे वर्ल्ड कप