नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अपेक्षेनुसार रोहित शर्माची भारताच्या कसोटी कर्णधारपदी अधिकृतरीत्या वर्णी लागली. तर जसप्रीत बुमराहला भारताचा नवा कसोटी उपकर्णधार बनविण्यात आले. कसोटी संघातून अनुभवी चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांना संघातून वगळण्यात आले.
दुखापतीतुन सावरल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले असून, भविष्यातील संघबांधणीच्या दृष्टीने केएस. भारत, सौरभ कुमार, प्रियांक पांचाळ या नावांना निवड समितीने संधी दिली आहे. भारताच्या नव्या कसोटी संघाची घोषणा करताना निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा म्हणाले की, ‘लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांनी रोहितच्या नेतृत्वाखाली भविष्यातील कर्णधारपदाच्या दृष्टीने तयार करण्यात येणार आहे.’
राहुल दुखापतग्रस्त असल्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराहला उपकर्णधार केल्याचे निवड समितीच्या वतीने सांगण्यात आले. राहुलपाठोपाठ फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याचाही या मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही. तर रोटेशन पॉलिसीनुसार शार्दूल ठाकूरला विश्रांती देण्यात आली. रहाणे, पुजारा यांच्यासंदर्भात बोलताना शर्मा म्हणाले, ‘निवड समितीने या दोघांच्या निवडीबाबत खूप चर्चा केली. शेवटी आम्ही त्यांनी सांगितले आहे की, श्रीलंकेच्या मालिकेसाठी आम्ही तुम्हाला वगळत आहोत. पण म्हणून तुमच्यासाठी संघाचे दरवाजे बंद झालेले नाही. आम्ही त्यांना रणजीवर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला.’
कसोटी संघ
- फलंदाज : रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल.
- यष्टीरक्षक : ऋषभ पंत, केएस भरत.
- अष्टपैलू : रवींद्र जडेजा, रवी अश्विन (फिट असल्यास), जयंत यादव, सौरभ कुमार.
- फिरकीपटू : कुलदीप यादव. वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
भारताचा टी२० संघ
- फलंदाज : रोहित (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर.
- यष्टीरक्षक : ईशान किशन, संजू सॅमसन.
- अष्टपैलू : व्यंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, दीपक हुडा.
- फिरकीपटू : युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव.
- वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, (यष्टीरक्षक) आवेश खान.