icc odi world cup 2023 final | अहमदाबाद : १९ नोव्हेंबर २०२३ हा दिवस तमाम भारतीयांसाठी अत्यंत खास असणार आहे. कारण मागील एका दशकापासून ज्या क्षणाची भारतीय चाहते वाट पाहत होते तो क्षण अखेर आला असून टीम इंडिया २०११ नंतर प्रथमच विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. ऑस्ट्रेलियाला नमवून रोहितसेना तमाम भारतीयांना मोठी भेट देणार का हे पाहण्याजोगे असेल. या बहुचर्चित सामन्याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
फायनलच्या लढतीबद्दल बोलताना रोहितने सांगितले की, मी वन डे क्रिकेट पाहत मोठा झालो असल्याने हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. आमच्या संघाच्या यशात प्रशिक्षक राहुल द्रविड यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी खेळाडूंना स्वातंत्र्य दिले आणि ते २०२२ च्या विश्वचषकापासून खेळाडूंच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पावले टाकत आहोत. वन डे विश्वचषकासाठी आम्ही दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. आम्ही खेळाडूंना त्यांचे काम सांगून त्यांच्याकडून तशी तयारी करून घेतली.
दरम्यान, साखळी फेरीत ऑस्ट्रेलियालाच नमवून भारताने विजयी सलामी दिली होती. भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले.
२००३ ची पुनरावृत्ती
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून १८ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, उपांत्य फेरीत बलाढ्य न्यूझीलंडला ७० धावांनी पराभवाची धूळ चारून यजमान संघाने फायनलचे तिकिट मिळवले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला बाहेरचा रस्ता दाखवून ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद येथे फायनल खेळण्याचा मार्ग मोकळा केला. तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होत असून २० वर्षांचा बदला घेण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल.
Web Title: Team India captain Rohit Sharma held a press conference and commented on various issues ahead of the ICC ODI World Cup 2023 final match against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.