टीम इंडियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी मुंबई रणजी संघाच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सराव करण्याला पसंती दिली. हिटमॅन रोहित शर्मा सध्या सातत्याने फ्लॉप शोमुळे चर्चेत आहे. क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना यातून सावरण्यासाठी रोहित शर्मा मुंबई रणजी संघाच्या ताफ्यात घुसल्याचे दिसून आले. रोहित शर्मा आपल्या स्थानिक संघातील खेळाडूंसोबत सराव करून पुन्हा फॉर्ममध्ये परतण्यासाठी प्रयत्नशील दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई रणजी संघासोबत प्रॅक्टिस करताना दिसला रोहित
३७ वर्षीय रोहित शर्मानं २०२४-२५ च्या हंगामातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील निराशाजनक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. पाच डावांत ६.२० च्या सरासरीने फक्त ३१ धावा केल्यावर शेवटच्या कसोटी सामन्यात स्वत: बाहेर बसण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागला. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या. पण इतक्यात थांबणार नाही, हे त्याने स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमातील खास मुलाखतीतच स्पष्ट केले. टीम इंडियाकडून खेळताना आपला रुबाब पुन्हा दाखवण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबईच्या संघातील आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रॅक्टिस करताना दिसून आले.
रोहित-अजिंक्य जोडी जमली
रणजीच्या यंदाच्या हंगामात मुंबईचा संघ जम्मू काश्मिर विरुद्ध २३ जानेवारीला मैदानात उतरणार आहे. यासाठी मुंबईचा संघ वानखेडे स्टेडियमवर सराव करत आहे. स्टार स्पोर्ट्सनं रोहित शर्माचा रणजी संघातील खेळाडूंसोबत प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात रोहित शर्मा बॅटिंग करत असून नॉन स्ट्राइकवर अजिंक्य रहाणेची झलक पाहायला मिळते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा शेवटची संधी?
न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवामुळे रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. एवढेच नाही तर बॅटिंगमध्येही तो आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही त्याच्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी ठरू शकते. जर रोहित शर्मानं या स्पर्धेत स्वत:च्या सर्वोत्तम कामगिरीसह टीम इंडियाला जेतेपद मिळवून दिले तर गेल्या काही काळात त्याच्या नेतृत्वात जो अनर्थ झाला ते लोक विसरतील. एवढेच नाही त्याच्या कारकिर्दीसंदर्भात सुरु असलेल्या उलट सुलट चर्चाही बंद होतील. ही गोष्ट रोहित शर्मालाही चांगलीच कळतीये. त्यामुळे रणजी संघाच्या सराव सत्रावेळी त्यानेही नॅशनल ड्युटी सर्वोत्तम बजावता यावी, यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते. याचा त्याला कितपत फायदा मिळणार ते येणारा काळच ठरवेल.
Web Title: Team India Captain Rohit Sharma Seen Batting With Ajinkya Rahane Mumbai Ranji Trophy Captain Wankhede Stadium Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.