rohit sharma speech in marathi : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज कर्जत जामखेडमध्ये क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित राहिला. रोहितच्या हस्ते येथील राशीन गावात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन झाले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा स्थानिक आमदार रोहित पवार उपस्थित होते. रोहित शर्माला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी हजेरी लावली. उपस्थितांना संबोधित करताना रोहितने त्याच्या शैलीत मराठीतून संवाद साधला. ही अकादमी रोहित शर्मा सुरू करत असून, ग्रामीण भागातील त्याची पहिलीच अकादमी आहे. खरे तर ही अकादमी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असेल.
रोहित शर्मा म्हणाला की, अलीकडेच आम्ही आमचे मोठे लक्ष्य गाठत भारतासाठी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकल्यावर माझ्या जीवात जीव आला. पण, मी आज इथे कशासाठी आलोय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. क्रिकेट हा खेळ सर्वांनाच आवडतो. इथे आम्ही क्रिकेट अकादमी सुरू करतो आहोत. मला खात्री आहे की, पुढचे यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह सगळे इथूनच येतील. माझे मराठी एवढेच होते. तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिल्याबद्दल आभार. इथे पुन्हा येण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. दरम्यान, टीम इंडियाच्या कर्णधाराची एक झलक पाहण्यासाठी कर्जत जामखेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. रोहितने देखील चाहत्यांना नाराज न करताना त्यांचा उत्साह वाढवला. हिटमॅनला पाहण्यासाठी भरपूर गर्दी जमली होती. रोहित शर्माचे व्यासपीठावर आगमन होताच उपस्थितांनी रोहित रोहित रोहित असा जयघोष सुरू केला. मग हिटमॅनने मंचावरील सर्व पूजनीय असलेल्या व्यक्तींच्या प्रतिमेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.