- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर)
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचे स्थान टी-२० विश्वचषकात निश्चित असेल. रोहित आणि विराट या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या तुलनेत युवा खेळाडूंना स्थान मिळावे, अशीच चर्चा रंगते. त्याचवेळी मोठ्या धावा उभारण्यास, सामना जिंकून देण्यास कोण उपयुक्त ठरतात? हेच दोन खेळाडू. दोघांकडे क्लास आणि अनुभव आहे. त्यामुळे त्यांचे स्थान युवांना द्यावे, ही चर्चा निष्फळ ठरते.
बुमराहसारखा जगात दुसरा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज नाही. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत त्याने यशस्वी मारा केला. आता आयपीएलमध्येही भेदक ठरत आहे. अष्टपैलू जडेजाचे आकडे प्रभावी वाटत नसले तरी तो चेन्नईचा स्तंभ आहे. त्यामुळे सर्व अनुभवी चेहऱ्यांना प्राधान्याने संघात स्थान देण्यास हरकत नाही. आता प्रश्न उरतो की, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंचे काय? हे सर्व जण भारताचे प्रतिनिधित्व करीत असतात. पण, विश्वचषक संघात स्थान मिळविणे आणि ते टिकविणे यासाठी कठोर मेहनतीची गरज असेल. 'चलता हैं... ही वृत्ती घात करू शकते.
अभिषेक, तिलक, रियानचा दावाआयपीएलच्या पहिल्या आठवड्यात भारतीय युवा खेळाडूंची कामगिरी अधोरेखित झाली. हैदराबादचा २३ वर्षांचा अभिषेक शर्मा याने फटकेबाजीत प्रभावित केले. मुंबईचा तिलक वर्मा, राजस्थानचा रियान पराग आणि रिंकूसिंग यांची कामगिरीही शानदार ठरली.
बुमराह अर्शदीपचे संयोजन भेदक!पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपसिंग हा चेंडूत विविधता आणतो. बुमराहसोबत संयोजनासाठी तो लाभदायी ठरू शकेल. शमीच्या अनुपस्थितीत सिराजला मुकेश कुमारकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
अनेक फिरकीपटू दावेदारफिरकीत रवींद्र जडेजाच्या सोबतीला अनेक दावेदार आहेत. त्यात कुलदीप यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, साई किशोर, शम्स मुलानी, वॉशिंग्टन सुंदर यांच्यात चुरस असेल,
यष्टिरक्षणातही स्पर्धालोकेश राहुल, ऋषभ पंत, ईशान किशन, धृव जुरेल, संजू सॅमसन हे तज्ज्ञ यष्टिरक्षक फलंदाज आहेत. विश्वचषकाच्या संघात एक किंवा दोन यष्टिरक्षक राहू शकतात.
हार्दिकवर सर्वाधिक नजरहार्दिक पांड्यामुळे निवडकर्ते अडचणीत येऊ शकतात. मुंबईविरुद्ध कर्णधार आणि खेळाडू म्हणून तो अपयशी ठरला. सध्याच्या काळात भारताचा तो सर्वश्रेष्ठ अष्टपैलू होता. पण, जखमेमुळे समस्या उद्भवली आणि आत-बाहेर होत राहिला. टी-२० विश्वचषक संघात त्याला स्थान मिळविण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.