Virat Kohli vs BCCI, Chetan Sharma Statement: भारतीय संघ आफ्रिकेविरूद्ध १९ जानेवारीपासून वन डे मालिका खेळणार आहे. १९,२१ आणि २३ असे तीन दिवस तीन सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा झाली. रोहित शर्मा वन डे आणि टी२० संघाचा कर्णधार असला तरी त्याच्या दुखापतीमुळे केएल राहुलला संघाचे कर्णधारपद देण्यात आले. विराटने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर काही दिवसांनी त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले होते. त्यानंतर विराट विरूद्ध बीसीसीआय असा वाद पाहायला मिळाला. विराटने स्वत:ची तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने BCCI ची बाजू मांडली होती. पण हा वाद निवड समितीचा असल्याने त्यांच्याकडून स्पष्टीकरण यायला हवं असं अनेक क्रिकेट जाणकारांनी सांगितलं. त्यानुसार, आज संघ जाहीर केल्यानंतर विराटच्या कर्णधारपदाच्या वादावर मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी मौन सोडलं.
"विराटने टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडण्याच्या बैठकीच्या वेळी कर्णधारपद सोडण्याबद्दल सांगितलं आणि सारेच चकित झाले. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी त्याला या निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितला होता. विराटच्या निर्णयाचा परिणाम विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीवर होईल असंही मत अनेकांनी मांडलं. भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी तरी त्याने कर्णधारपद सोडू नये असं साऱ्यांनी त्याला सांगितलं होतं. पण त्याने तसं केलं नाही. त्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला होता", असं चेतन शर्मा यांनी सांगितलं.
"कोणताही निर्णय घेण्याआधी टी२० विश्वचषक स्पर्धा संपू दे असं सर्व सदस्यांनी विराटला सांगितलं होतं. टी२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू असताना विराटने ही घोषणा केली होती. जर टी२० कर्णधारपद सोडलं तर वन डे संघाचं पदही सोडावं लागेल हे विराटला सांगण्याची ती योग्य वेळ नव्हती. जेव्हा जेव्हा विराटने कर्णधारपद सोडण्याची गोष्ट केली तेव्हा त्याला सारे जण पुन्हा विचार करायला सांगत होते. त्याला असंही सांगितलं होतं की विश्वचषक स्पर्धा संपल्यावर आपण या मुद्द्यावर चर्चा करूया. सध्या आपल्याला सर्वोत्तम संघ घेऊन विश्वचषकात चांगली कामगिरी करायची आहे. पण तसं घडलं नाही", असंही चेतन शर्मा यांनी नमूद केलं.