टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी२० सामन्यांची मालिका उद्यापासून सुरू होणार आहे. पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या IPLमधील नेतृत्वकौशल्याचे कौतुक केले. यासोबतच द्रविडने टीम इंडियाचे टॉप ३ फलंदाज कर्णधार रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्यावरील प्रश्नालाही चोख प्रत्युत्तर दिले.
हार्दिकबद्दल काय म्हणाला द्रविड?
हार्दिकबद्दल द्रविड पत्रकार परिषदेत म्हणाला, "मी हार्दिक पांड्याला भेटलो. तो आता एकदम फिट आहे. IPL मध्ये हार्दिकने कर्णधार म्हणून केलेली कामगिरी खूपच चांगली होती. आमच्यासाठी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे हार्दिकने गोलंदाजी सुरू केली आहे. यामुळे संघाला गोलंदाजीचे अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि संघ अधिक मजबूत होईल. आम्ही त्याच्याकडून क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करू शकतो.
टीम इंडियाच्या टॉप-३ बद्दल मोठं विधान
"आम्हाला आमच्या टॉप ३ खेळाडूंबद्दल माहिती आहे. त्यांच्या क्षमतेची देखील कल्पना आहे. तिघेही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या फलंदाजीच्या क्रमात बदल होणार नाही. या मालिकेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सुरुवात करण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. तसेच, परिस्थितीनुसार खेळ खेळण्यावर संघाचे लक्ष असेल. मोठ्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी त्यांचा स्ट्राइक रेट चांगला ठेवला पाहिजे. पण विकेट जेव्हा गोलंदाजीसाठी पोषक असेल तेव्हा विकेट टिकवण्याची साऱ्यांनाच गरज असेल. त्यामुळे खेळाडूंनी खेळपट्टीवर राहून खेळावे ही त्यावेळी काळाची गरज असेल", अशी भूमिका राहुल द्रविडने स्पष्ट केली.