Join us  

"मला विराटकडून शतक नकोय, त्यापेक्षा..."; राहुल द्रविडने केली वेगळीच मागणी

विराट गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्म मिळवण्यासाठी झगडतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:56 PM

Open in App

Rahul Dravid on Virat Kohli: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा गेल्या कित्येक महिन्यांपासून लयीत परतण्याचा प्रयत्न करतोय. विराटने २०१९ मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. पण त्यानंतर मात्र त्याला आपल्या फलंदाजीत फारशी लय सापडली नाही. कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये फार चमक दाखवणं शक्य झालेलं नाही. यावरून विराट कोहलीवर नेहमीच टीका होत असते. काही दिग्गजांनी कोहलीचे समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीका केली. पण टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने मात्र कोहलीची पाठराखण केली आहे. विराटचे समर्थन करताना मला त्याच्याकडून शतक नकोय, असं राहुल द्रविड म्हणाला.

"तिशी ओलांडल्यावर विराट कोहलीची फलंदाजीतील लय हरवली असं म्हणणं चुकीचं ठरेल. विराट हा आतादेखील अतिशय फिट खेळाडू आहे. तो प्रचंड मेहनती आहे. धावा करण्यासाठी असलेली त्याची भूक आणि अँटिट्यूड या गोष्टी खूपच चांगल्या आहेत. लिस्टरशायरविरूद्ध च्या सामन्यात तो खेळत होता त्यावेळी त्याची क्रिकेटची तयारी दिसून आली. त्याने ५०-६० केल्या असल्या तरी त्यात त्याची दमदार खेळी नक्कीच भावली", असे द्रविड म्हणाला.

"खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यावर काही वेळा तुम्हाला वाईट फॉर्मचा सामना करावा लागतो. विराटला लय न सापडणे यामागे त्याची कमी मेहनत कारणीभूत आहे असं मला अजिबात वाटत नाही. विराटमध्ये महत्त्वाकांक्षा आहे हे स्पष्ट दिसते. मला विराट कोहलीकडून शतकाची अपेक्षा नाही. त्याउलट कठीण काळात आणि गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर विराटने ७० धावांची झुंजार खेळी जरी केली तरी मला त्याचा जास्त आनंद होईल", असेही द्रविड म्हणाला.

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App