Join us  

Rahul Dravid : “मी सेहवाग, तेंडुलकरसारखा बनू शकत नाही याची जाणीव होती,” वाचा काय म्हणाला द्रविड

विरेंद्र सेहवाग किंवा सचिन तेंडुलकर यांच्यासारखी फलंदाजी करू शकत नाही हे मला आधीच कळले होते, असे भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 1:22 PM

Open in App

भारतीय क्रिकेटमध्ये संयम ठेवून खेळणारा खेळाडू म्हणून राहुल द्रविडकडे पाहिलं जायचं. त्या द वॉल असंही म्हटलं जायचं. राहुल द्रविड जेव्हा भारतीय संघाचा एक भाग होता तेव्हा संघात विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे फलंदाजही होते. द्रविड हा असाच एक फलंदाज होता, ज्याची शैली इतर फलंदाजांपेक्षा वेगळी होती. अनेकदा विरोधी संघाचे गोलंदाजही त्याच्यामुळे हैराण झाल्याचे पाहायला मिळाले होते.

इन द झोन पॉडकास्टवर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रासोबत बोलताना, “मला कधी सेहवाग किंवा सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणे कधी स्वतंत्रपणे स्कोअर करायचा नव्हता. परंतु त्यांनी दबावाचा सामना करणं आणि काही उत्कृष्ट गोलंदाजांचा सामना करण्याचा आपला मार्ग शोधला होता. सेहवाग आक्रमक शैलीचा फलंदाज होता. तर तेंडुलकर वेळो वेळी आपली खेळी बदलणारा खेळाडू होता. तो परिस्थिती प्रमाणे आपल्या खेळात बदल करत होता,” असं द्रविड म्हणाला. इन द झोन पॉडकास्टमध्ये अभिनव बिंद्रासह संवाद साधताना त्यानं यावर वक्तव्य केलं.

"प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी सेहवागसारखा कधीच बनणार नव्हतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याला स्विच ऑफ करणे खूप सोपे वाटले. मी त्या पातळीपर्यंत कधीच पोहोचणार नव्हतो. परंतु मी माझ्या काही गोष्टी समजून घेतल्या,” असंही तो म्हणाला. मानसिक रित्या सक्षम असणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं जिम आणि सरावांमध्ये अतिरिक्त तास देणं. सर्व काही केलं परंतु तुम्ही मानसिक रित्या स्विच ऑफ करण्यास असमर्थ राहिलात तर खेळण्यासाठी तुमच्याकडे योग्य ऊर्जाही राहणार नाही. जेव्हा मी कारकिर्दितील तीन चार वर्षांना ओळखण्यास सुरूवात केली तेव्हा मी स्विच ऑफ करण्याचे अधिक प्रयत्न केले आणि त्याची मला मदतही झाली, असं तो म्हणाला.

तेव्हा या गोष्टी जाणवल्या…“जशी माझी कारकिर्द पुढे सरकत होती तसं मला हे जाणवत होतं की मी कधी सेहवाग किंवा तेडुलकर प्रमाणे तेजीनं स्कोअर करणारा बनणार नाही. मला कायम धैर्याची गरज होती. मला माझ्यातला आणि गोलंदाजांमधला सामना आवडत होता. मी त्यालाच माझा स्पर्धक बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला आणखी लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली,” असंही द्रविडनं स्पष्ट केलं.

टॅग्स :राहुल द्रविडसचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवाग
Open in App