मेलबोर्न : ॲडिलेडमध्ये झालेला पराभव विसरून टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी मंगळवारी खेळाच्या प्रत्येक विभागात ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवत चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.उपाहाराला ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांत गुंडाळल्यानंतर भारतापुढे विजयासाठी ७० धावांचे लक्ष्य होते. भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने ३२६ धावांची मजल मारली होती.
ॲडिलेडमध्ये आपल्या नीचांकी ३६ धावांवर बाद झाल्यामुळे लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर झालेली जखम या पराभवामुळे काहीअंशी भरून निघाली. त्याचसोबत नियमित कर्णधार आणि आयसीसीचा दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मिळविलेल्या या विजयामुळे अजिंक्य रहाणेने आपले कुशल नेतृत्व सिद्ध केले आणि त्याचसोबत पहिल्या डावात शतकही झळकावले.रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत तिन्ही कसोटी सामन्यांत विजय मिळवला आहे, त्यातील दोन ऑस्ट्रेलियाविरुद्ध व एक अफगाणिस्तानविरुद्धचे विजय आहेत.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या डावात मयांक अग्रवाल (५) व चेतश्वर पुजारा (३) यांच्या विकेट गमावल्या. त्यानंतर मात्र शुभमन गिल (३६ चेडूंमध्ये ३५ धावा) आणि रहाणे (४० चेंडूंमध्ये २७ धावा) यांनी संघाला लक्ष्य गाठून दिले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गिलने दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला समर्थपणे तोंड दिले तर उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद सिराजने त्याची उणीव भासू दिली नाही.कालच्या ६ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियन संघ २०० धावांत बाद झाला. भारतातर्फे जसप्रीत बुमराहने २७ षटकांत दोन व सिराजने २१.३ षटकांत ३ बळी घेतले. दोघांनी अचूक मारा करताना पाटा खेळपट्टीवर अधिक प्रयोग करण्याची गरज नसल्याचे सिद्ध केले. रविचंद्रन अश्विनने ३७.१ षटकांत ७१ धावांच्या मोबदल्यात २ तर रवींद्र जडेजाने १४ षटकांत २८ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियातर्फे कॅमरन ग्रीन व पॅट कमिन्स यांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली, पण दुसऱ्या नव्या चेंडूला सामोरे जाणे त्यांना जमले नाही. ग्रीनने १४६ चेडूंमध्ये ४५ धावा केल्या तर कमिन्सने १०३ चेंडूंमध्ये २२ धावांची खेळी केली.बुमराहने दुसऱ्या नव्या चेंडूने कमिन्सला बाद केले. ग्रीन सिराजविरुद्ध पुलचा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर सिराजने नॅथन लियोनला माघारी परतवले.