T20 World Cup 2024 Semi Final Ind vs Eng: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताने (Team India) आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरी आणि नंतर सुपर-8 मध्ये भारताने आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुपर-8 च्या गट-1 मध्ये भारत अव्वल स्थानावर आहे. आता भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना २७ जून रोजी इंग्लंडशी (England) होणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास, भारताचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेटरसिकांना पडला असेलच. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...
चाहत्यांसाठी वाईट बातमी म्हणजे या सामन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडला आणि उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर काय? या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे का? सामना रद्द झाल्यास भारतीय संघ बाहेर पडेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
या विश्वचषकात एक विचित्र गोष्ट म्हणजे दुसऱ्या सेमीफायनलसाठी आयसीसीने कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. तर पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाऊस पडल्यास राखीव दिवसाऐवजी त्या सामन्यासाठी ४ तास १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे, जेणेकरून सामना त्याच दिवशी खेळता येईल.
सामना रद्द करावा लागला तर काय?
२७ जून रोजी सामन्याच्या दिवशी गयानामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो. अशा परिस्थितीत ४ तास १० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण करण्याचा पहिला प्रयत्न केला जाईल. असे न झाल्यास ग्रुप स्टेजमधील टप्प्यात अव्वल स्थानी असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजेच या नियमाचा फक्त भारतालाच फायदा होईल. भारतीय संघाने सुपर-8 च्या गट-1 मध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अशा परिस्थितीत सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचा थेट अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल. तर ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर होईल.