Team India For T20 World Cup 2024 : २ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून अपघातातून सावरलेल्या रिषभ पंतला संधी मिळाली आहे. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन देखील १५ सदस्यीय संघाचा भाग आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये पंत की सॅमसन कोणाला संधी मिळणार याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. अशातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सॅमसनला प्राधान्य दिले.
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएलच्या १३ सामन्यांत ५०४ धावा केल्या आहेत. चांगल्या लयनुसार खेळत असलेला सॅमसन विश्वचषकात कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहण्याजोगे असेल. रिषभ पंतही चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १५५ च्या स्ट्राईक रेटने ४४६ धावा कुटल्या आहेत.
'भज्जी'ने सांगितली रणनीतीवृत्तसंस्था ANI शी बोलताना हरभजन सिंगने म्हटले की, रिषभ पंतने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या अपघातातून परतल्यानंतर त्याने आपली छाप सोडली. यष्टीरक्षक म्हणूनही त्याने धाक कायम ठेवला. त्यामुळेच त्याला विश्वचषकाच्या संघात संधी मिळाली असावी. पण, संजू सॅमसन प्रभावी कामगिरी करत आहे. त्यामुळे मला वाटते की, यष्टीरक्षक म्हणून संजूला अधिक प्राधान्य द्यायला हवे. तसेच भारतीय संघ उत्तम असून रिंकू सिंगला फिनिशरच्या भूमिकेत पाहायला आवडेल. तो एकमेव असा खेळाडू आहे, जो अखेरच्या षटकात स्फोटक खेळी करू शकतो. २० चेंडूत ६० धावा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. खेळपट्टी पाहून २-३ फिरकीपटूंना संधी दिली जाऊ शकते, असेही भज्जीने सांगितले.
विश्वचषकासाठी भारताचा संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ