Join us  

Indian Cricketer Father Arrested: धक्कादायक! भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना अटक; 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या शाखेत केला आर्थिक घोटाळा

सुमारे ५० लाखांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 1:35 PM

Open in App

Indian Cricketer Father Arrested: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझा (Naman Ojha) याचे वडील विनय ओझा यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दिग्गज क्रिकेटपटूच्या वडिलांवर ५० लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. नमन ओझा याच्या वडिलांना ६ जून रोजी मध्य प्रदेशातील बैतुल येथील मुलताई येथून अटक करण्यात आली. विनय ओझा हे जौलखेडा गावात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या शाखेत कार्यरत होते. तत्कालीन बँक व्यवस्थापकावर फसवणुकीसह इतर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. फसवणूक आणि इतर अनेक कलमांन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा फरार झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होती अखेर ६ जून रोजी बैतूल येथील मुलताई येथून त्यांना अटक करण्यात आली.

एसडीओपी नम्रता सोंदिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओझा यांना एक रिमांडमध्ये घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. २०१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तैनात असलेले जौलखेडा बँक व्यवस्थापक अभिषेक रत्नम, विनय ओझा आणि आणखी एक अशा तिघांनी मिळून बनावट नाव आणि फोटोच्या आधारे किसान क्रेडिट कार्ड बनवून बँकेतून पैसे काढले होते. तरोडा येथील वृद्ध रहिवासी दर्शन याने वडील शिवलू यांच्या निधनानंतरही त्यांच्या नावावर खाते उघडून पैसे काढले होते. तसेच अन्य शेतकऱ्यांच्या नावे किसान क्रेडिट कार्ड बनवून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये काढण्यात आले.

पोलिसांनी अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून केली अटक

बँकेतून रक्कम काढल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक अभिषेक रत्नम, विनय ओझा, लेखापाल नीलेश चलोत्रे, दीनानाथ राठोड आदींनी रक्कम वाटप केली. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी अभिषेक रत्नम, विनय ओझा, नीलेश चलोत्रे आणि इतरांविरुद्ध कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०बी, ३४ आणि आयटी कायद्याच्या कलम ६५, ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तत्कालीन बँक व्यवस्थापक अभिषेक रत्नम, नीलेश चलोत्रे आदींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून विनय ओझा फरार होते. त्यांना सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

विनय ओझा हे माजी क्रिकेटपटू नमन ओझा यांचे वडील आहेत. नमनने फेब्रुवारी २०२१ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

 

टॅग्स :गुन्हेगारीभारतीय क्रिकेट संघधोकेबाजीअटक
Open in App