IPL 2021: भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) फिटनेसच्या समस्येला तोंड देत असताना ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीनं भारतासामोर मोठं संकट निर्माण झालं आहे. हार्दिक पंड्या सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळत असला तरी तो गोलंदाजी करत नाहीय. त्यामुळे भारतीय संघातील त्याच्या समावेशाबाबत आता शंका उपस्थित झाली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या जागी आता नव्या युवा खेळाडूच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
आयपीएलच्या यंदाच्या पर्वात दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) पदार्पण केलेल्या व्यंकटेश अय्यर यानं जबरदस्त कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फलंदाजीसोबतच व्यंकटेश अय्यरनं गोलंदाजीतही कमाल करुन दाखवली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात व्यंकटेशनं केलेल्या जबरदस्त गोलंदाजीनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
व्यंकटेशनं दिल्ली कॅपिटल्सच्या शिमरन हेटमायर आणि अक्षर पटेल यांची विकेट घेतली. त्यानं ४ षटकांमध्ये २९ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. याशिवाय स्थानिक ट्वेन्टी-२० करिअरमध्ये व्यंकटेशची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यानं आतापर्यंत ४१ सामन्यांमध्ये २१ बळी घेतले आहेत. तर फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये ७ आणि २४ ए लिस्ट सामन्यांमध्ये १० विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे आपल्या अष्टपैलू कामगिरीनं व्यंकटेशनं भारतीय संघातील हार्दिक पंड्याच्या जागी उत्तम पर्याय असल्याचं दाखवून दिलं आहे.
१७ ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० वर्ल्डकप
आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन १७ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये होत आहे. यात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. अंतिम सामना १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
Web Title: team india hardik pandya option ipl 2021 venkatesh iyer uae
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.