जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाने शाळकरी मुलांप्रमाणे चुका केल्या. भारतीय संघाने अशा चूका टाळल्या पाहिजेत असे मत टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. दुस-या कसोटीत भारताचे तीन फलंदाज रनआऊट झाले होते. त्या अनुषंगाने शास्त्री यांनी हे विधान केले. केप टाऊन आणि पाठोपाठ सेंच्युरियन कसोटीतील पराभवामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आधीच गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-0 असा विजयी आघाडीवर आहे. तिसरा आणि अंतिम कसोटी सामना 24 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
सरावानंतर पत्रकारांशी बोलताना शास्त्री म्हणाले कि, सेंच्युरियन कसोटीत भारतीय फलंदाज ज्या पद्धतीने धावबाद झाले त्याचे निश्चितच दु:ख आहे. आव्हान खडतर असताना अशा पद्धतीने आऊट होणे परवडणारे नाही. पुढे अशा चुका घडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. शाळकरी मुलांसारख्या या चूका आहेत असे शास्त्री म्हणाले.
विदेशातील परिस्थितींमुळे आम्ही मालिकेत पिछाडीवर पडलो. या दौ-याची सुरुवात दहा दिवस आधीपासून करायला पाहिजे होती, जेणेकरून खेळाडूंनी येथील वातावरण आणि परिस्थितींशी स्वत:ला जुळवून घेतले असते,’ असे मतही रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.‘आम्ही कोणतेही कारण देऊ इच्छित नाही. आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो ती दोन्ही संघासाठी तयार करण्यात आली होती आणि दोन्ही कसोटी सामन्यांत आम्ही २० बळी मिळवले. यामुळे आम्हाला दोन्ही सामन्यांत विजयाची संधी मिळाली होती. जर आमची आघाडीची फळी यशस्वी झाली, तर तिसरा सामनाही चांगला होईल,’ असेही शास्त्री यांनी म्हटले.
जर अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत खेळला असता आणि अपयशी ठरला असता, तर तुम्ही असेच विचारले असते की, रोहितला का नाही खेळवले. रोहित खेळला आणि चांगली कामगिरी करु न शकल्याने तुम्ही मला अजिंक्यला का खेळवले नाही, असे विचारत आहात. हीच गोष्ट वेगवान गोलंदाज निवडीवरही लागू होत आहे. तुमच्याकडे पर्याय आहेत. संघ व्यवस्थापन सर्वोत्कृष्ट पर्यायावर विचार करत आहे. त्यानुसारच संघ निवडला जाईल.