Join us  

नव्या वर्षात टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी

ज्या पद्धतीने भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला. त्यावरून आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे आहे आणि ही या नव्या वर्षातील उत्तम सुरुवात असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 12:46 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)ज्या पद्धतीने भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला. त्यावरून आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे आहे आणि ही या नव्या वर्षातील उत्तम सुरुवात असेल. भारतीय संघ सध्या पूर्ण लयीत परतल्यासारखा वाटतोय. गोलंदाजांनी गेल्या वर्षभरात बरेच कीर्तीमान स्थापन केले. त्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या त्रिकुटाने नोंदवलेला विक्रमही आहे. फलंदाजीत मात्र आपण थोडे कमी पडलो होतो. परंतु, गेल्या सामन्यात मयांक अग्रवाल हा आत्मविश्वासाने खेळला त्यावरून संघ मजबूत झाल्यासारखा वाटत आहे. विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांनीही जबरदस्त प्रदर्शन केले. कुठेतरी फलंदाजी कमी पडत होती ती उणीव तिसऱ्या सामन्यात खेळाडूंनी भरून काढली, त्यामुळे आता चौथा सामनाही आपणच जिंकावा, असे वाटते.आर. आश्विन सध्या दुखापतींचा सामना करीत आहे. तो संघात नसल्याने चिंता वाटते. कारण, तो भारताचा आघाडीचा फिरकीपटू आहे. मात्र, जडेजाने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या अनुपस्थितीत कुलदीप यादवला संधी मिळेल. जडेजा-यादव ही फिरकीपटंूची जोडी आॅस्ट्रेलियन संघावर दबाव टाकू शकेल; कारण आॅस्ट्रेलियन फलंदाजी तेवढी मजबूत नाही. हनुमा विहारी हासुद्धा एक पर्यायी गोलंदाज म्हणून संघात असेल. भारताच्या तुलनेत आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा विचार केला तर ती कमकुवत वाटते. कारण, आॅस्ट्रेलियाकडे ‘इनफॉर्म’ फलंदाज कमी आहेत. या संघाचा गोलंदाजांवर अधिक विश्वास आहे. मात्र, गोलंदाजही इतके यशस्वी ठरलेले नाहीत. त्याचे कारण चेतेश्वर पुजारा, विराट कोहली हे चांगले खेळत आहेत. आॅस्ट्रेलियाचा नाथन लेयॉन हा पुढील सामन्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भारतीय फलंदाजांचे त्याच्यावर लक्ष असेल. खेळपट्टीचा विचार करता या सामन्यात जर तुम्ही ३५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर पराभवाची शक्यता कमी होते त्यामुळे भारतीय संघाने एवढ्या धावा करणे अपेक्षित आहे. या सामन्यातून ईशांत शर्माला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जर तो १३ मध्ये नसेल तर कुलदीप यादवला संधी मिळेल. बुमराह, शमी, जडेजा, कुलदीप अणि हनुमा विहारी हे पाच जण भारताकडून गोलंदाजी करतील.या वर्षाकडून आशाभारतीय क्रिकेट संघ मानांकनात अव्वल स्थानी आहे. या वर्षीसुद्धा त्यांना पहिले स्थान कायम राखण्याची संधी आहे. कारण पुढील काही महिने भारतीय संघ तसेच इतर संघ कसोटी खेळणार नाहीत. बहुतेक संघ हे आगामी विश्वचषकाची तयारी करतील. त्यामुळे भारताला नंबर वन स्थान कायम ठेवण्याची संधी आहे. ते कायम राहावी, असे मला वाटते. एकेकाळी वेस्ट इंडिज, इंग्लंड यांनी कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजविले होते. तोच काळ आता भारतीय संघासाठी आला आहे. याचा भारतीय संघाने लाभ घ्यावा, असे वाटते. दुसरीकडे, माझ्या मते, २०१८ मध्ये विराट कोहली ‘प्लेअर आॅफ इयर’ आणि जसप्रीत बुमराह ‘फाइंड आॅफ द इयर’ असे राहिले आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया