भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदम जबरदस्त केलीये. पर्थचं मैदान मारत बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत टीम इंडियानं १-० अशी आघाडी घेतलीये. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबर पासून अॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा टीमला जॉईन झाला असताना दुसऱ्या बाजूला कोच गौतम गंभीर मायदेशी परतणार आहे. गौतम गंभीर वैयक्तिक कारणास्तव भारतात परतणार असला तरी तो पुन्हा टीम इंडियाला जॉईन होणार असल्याचे वृत्त आहे.
काय आहे गौतम गंभीर मायदेशी परतण्याचे कारण...
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गौतम गंभीर हा फॅमिली इमर्जन्सीमुळं मायदेशी परतला आहे. नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. तो भारतात परतणार असला तरी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो पुन्हा संघात सामील होणार आहे, असा उल्लेखही वृत्तामध्ये करण्यात आला आहे. पर्थ कसोटी सामन्यातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ पिंक बॉल कसोटीसाठी अॅडलेडच्या मैदानात उतरण्यापूर्वी दोन दिवसीय प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे. या वेळी गौतम गंभीर संघासोबत नसेल. शनिवारी ३० नोव्हेंबरला भारतीय संघ कॅनबेरा येथे प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघा विरुद्ध दोन दिवसीय सराव सामन्यासाठी मैदानात उतरेल. या मॅचमध्ये भारतीय संघ एक दिवस फिल्डिंग तर एक दिवस बॅटिंग करताना दिसेल.
प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा तिढादुसऱ्या कसोटी संघासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे टीम इंडियासाठी आव्हानात्मक असेल. रोहित शर्मासह शुबमन गिल संघात कमबॅक करणार आहे. या दोघांच्या एन्ट्रीनंतर कुणाचा पत्ता कट होणार? भारतीय बॅटिंग ऑर्डरमध्ये पुन्हा बदल करावा का? यासारख्या प्रश्नाची उत्तरे टीम मॅनेजमेंटला शोधावी लागतील. पर्थ कसोटी सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं संघाच्या डावाची सुरुवात केली होती. त्याने धमकही दाखवलीये. पण रोहित परतल्यावर लोकेश राहुलच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये पुन्हा बदल पाहायला मिळू शकतो. तिसऱ्या क्रमांकावर शुबमन गिल आणि चौथ्या क्रमांकावर विराट फिक्स असल्यामुळे लोकेश राहुलला पाचव्या स्थानावरच खेळण्याची वेळ येऊ शकते.